मोटारस्पोर्ट्स देशात अधिकाधिक लोकप्रिय होण्यासाठी विसा, कर्नाटक मोटार स्पोर्ट्स क्लब यासारख्या संस्था प्रयत्न करीत असल्या तरी काही तांत्रिक बाबींचा अडथळा येत आहे. त्यामुळे अर्जुन पुरस्कारासाठी प्रयत्न करूनही तो दूर राहिला, अशी व्यथा मोटार स्पोट्र्समधील सध्याच्या अव्वल खेळाडू गौरव गिलने व्यक्त केली आहे.
इंडियन रॅली अजिंक्यपद स्पर्धेच्या या वर्षीच्या पाचव्या फेरीला शुक्रवारपासून येथे सुरूवात झाली. त्यावेळी या स्पर्धेचा संभाव्य विजेता म्हणून नाव घेतल्या जाणाऱ्या गौरव गिलने ‘लोकसत्ता’शी चर्चा करताना अनेक गोष्टींचा उलगडा केला. मोटारस्पोर्ट्स, वेस्टर्न इंडिया स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे आयोजित रॅली ऑफ महाराष्ट्र असो किंवा कर्नाटक  मोटारस्पोर्ट्स क्लबतर्फे आयोजित के१००० रॅली असो. प्रत्येक फेरीची काही वैशिष्टय़े असतात. रॅली ऑफ महाराष्ट्रामध्ये डोंगराळ भागातील रस्ते, तर के १००० रॅलीत तांत्रिकदृष्टय़ा अत्यंत कठीण रस्ते खेळाडूंची परीक्षा पाहतात, असे गीलने सांगितले.
फेडरेशन ऑफ मोटार स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया (एफएमएससीआय) अंतर्गत होणाऱ्या के १००० चे शुक्रवारी ओरियन माल येथे झेंडा दाखवून उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर बंगलोर इंटरनॅशनल एक्झिबिशन सेंटरमध्ये प्रेक्षकांसाठी विशेष टप्पा झाला. २२ नोव्हेंबर रोजी मुख्य स्पर्धेस सुरुवात होईल.