भारतीय जवानांना पाठिंबा देण्यासाठी भारताचा फलंदाज गौतम गंभीरने पुन्हा एकदा पुढाकार घेतला आहे. फिव्हर एफएमच्या साहाय्याने गौतम गंभीरने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर भारतीय जवानांबद्दल प्रेरणादायी संदेश देणारा व्हिडिओ ट्विट केला आहे. गंभीरने या व्हिडिओतून प्रत्येक भारतीय नागरिकाला ‘झिझक’ (द्विधा अवस्था) बाजूला सारून भारतीय जवानांना पाठिंबा देण्याचं आवाहन केलं आहे.

तोंडावर पट्टी बांधून बसलेला गंभीर यात कार्डबोर्डवर लिहिलेल्या संदेशातून भारतीय जवानांबद्दल देशातील नागरिकांनी आदर आणि अभिमान बाळगण्याचे आवाहन करतो. या अनोख्या कॅम्पेनला ‘झिझक की पट्टी’ असं नाव देण्यात आलं आहे. यात गंभीरने देशातील जवानांसोबतचे सेल्फी शेअर करण्याचं आवाहन यात केलं आहे.

गंभीरने नुकतेच पुढाकार घेऊन सीमेवर शहीद झालेल्या जवानांच्या चिमुकल्या मुलांचा शैक्षणिक खर्च करण्यासाठी पुढाकार घेतला होता. छत्तीसगढ येथे सुकमा हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांच्या मुलांच्या शैक्षणिक खर्चाची जबाबदारी गंभीरने उचलली. याशिवाय, काश्मीरमध्ये एका सीआरपीएफ जवानाला मारहाण झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त केला होता. भारतीय जवानाला लगावलेल्या एका थप्पड्या बदल्यात १०० जिहादींचा ठार करा, अशी संतप्त प्रतिक्रिया गंभीरने दिली होती.

यावेळी गंभीरने एक पाऊल पुढे टाकून भारतीय जवानांबद्दलचा आदर व्यक्त करण्यसाठी जनतेला आवाहन केलं आहे. ”मी एक पाऊल पुढे टाकलंय..तुम्ही टाकणार का?”, असं ट्विट करून गंभीरने पंतप्रधान नरेंद्र मोदी, पंतप्रधान कार्यालय, फिव्हर एफएम आणि मेजर गौरव आर्या यांना टॅग केलं आहे. काय मग बघता काय सामील व्हा…