भारतीय संघाचा सलामीवीर गौतम गंभीर याचे तब्बल दोन वर्षांनतर भारतीय क्रिकेट संघात पुनरागमन झाले आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱया कसोटी सामन्यासाठी गौतम गंभीरचा संघात समावेश करण्यात आला आहे. गौतम गंभीरसोबतच फिरकीपटू जयंद यादवलाही संधी देण्यात आली आहे.

कानपूर कसोटीत दुखापतग्रस्त झाल्याने लोकेश राहुल याला दुसऱया कसोटीला मुकावे लागणार आहे. लोकेश राहुलच्या जागी गौतम गंभीरचा भारतीय संघात समावेश केला जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यावर बीसीसीआयकडून शिक्कामोर्तब झाले आहे. तर इशांत शर्माला चिकनगुनिया झाल्यामुळे त्याच्या जागी जयंत यादव या नव्या चेहऱयाला संधी देण्यात आली आहे. बीसीसीआयने बुधवारी रात्री गंभीर आणि जयंत यादवच्या भारतीय संघातील समावेशाबाबतची माहिती दिली. गंभीरच्या भारतीय संघातील समावेशाबाबतची माहिती समोर येताच क्रीकेट क्षेत्रातील अनेकांनी गंभीरला शुभेच्छा देखील दिल्या.

गौतम गंभीर भारतीय संघासाठी २०१४ साली इंग्लंड विरुद्ध आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळला होता. या सामन्यात गंभीरला केवळ तीन धावा करता आल्या होत्या. त्यानंतर गंभीरने राष्ट्रीय संघातील स्थान गमावले होते. संघातून वगळण्यात आल्यानंतर गंभीर गेल्या दोन वर्षांपासून स्थानिक क्रिकेट सामन्यांत दमदार कामगिरी करून आपली योग्यता सिद्ध करून दाखवली. याचेच फलित म्हणून गंभीरला संघात स्थान देण्यात आले आहे.

गौतम गंभीरने दुलीप करंडक स्पर्धेत ७१.२० च्या सरासरीने तब्बल ३५६ धावा कुटल्या होत्या. ‘इंडिया ग्रीन’ विरुद्धच्या सामन्यातील दोन डावांत प्रत्येकी ९० आणि ५९ धावांची खेळी साकारली होती. त्यानंतर अंतिम सामन्यात ‘इंडिया रेड’ विरुद्ध गंभीरने दोन डावांत प्रत्येकी ९६ आणि ३६ धावांची खेळी साकारून संघाला करंडक जिंकून दिला होता. स्थानिक क्रिकेट स्पर्धेतील गौतम गंभीरच्या कामगिरीच्या निकषांवरून त्याला राष्ट्रीय संघात स्थान देण्यात आल्याचे सांगितले जात आहे.