भारतीय संघाची वॉल म्हणून ओळखला जाणाऱ्या राहुल द्रविडच्या निवृत्तीनंतर कसोटी संघात त्याची जागा कोण घेणार अशी प्रत्येकाला चिंता होती. मात्र सौराष्ट्राच्या चेतेश्वर पुजाराने आपल्या खेळीने या चिंतेवर समाधान मिळवलं आहे. द्रविडच्या निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराने कसोटी संघात तिसऱ्या क्रमांकाची जागा आपल्या नावे केली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक सामना आणि मालिकेत पुजाराने आपल्या कामगिरीत सुधारणा केली आहे. कर्णधार विराट कोहलीनेही याबद्दल चेतेश्वर पुजाराच्या खेळीचं कौतुक केलेलं आहे. सध्या श्रीलंकेविरुद्ध सुरु असलेल्या कसोटी मालिकेत चेतेश्वर पुजाराच्या नावे २ शतकांची नोंद करण्यात आलेली आहे.

भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने यावेळी पुजाराच्या खेळीचं कौतुक करताना, पुजाराला सातत्याने खेळ करण्याच्या बाबतीत कोहलीच्याही पुढचं स्थान दिलं आहे. DNA या इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत गंभीर बोलत होता. ” आपण कसोटी क्रिकेटला महत्व देत नाही. वन-डे आणि टी-२० सामन्यांमध्ये खेळाडूने चांगली कामगिरी केली तरच त्याच्या खेळाला प्रसिद्धी मिळते. मात्र जेव्हा कसोटी क्रिकेट खेळण्याची वेळ येते तेव्हा, पुजारा हा कोहली किंवा धवन यांच्यापेक्षा सरस ठरतो”. कोहली-धवनच्या खेळापेक्षा पुजाराच्या खेळात जास्त सातत्य असल्याचंही गंभीरने बोलून दाखवलं आहे.

पुजारा हा आतापर्यंत वन-डे, टी-२० पेक्षा जास्त कसोटी सामने खेळला आहे. त्यामुळे कसोटी सामन्यांमध्ये फलंदाजीसाठी लागणारी मानसिकता, सातत्य हे पुजाराकडे भरभरुन आहे. तसा त्याचा सरावही आहे. पुजारा हा गुणी खेळाडू आहे, यात कोणताही वाद नाही. त्यात पुजाराकडे काऊंटी क्रिकेट खेळण्याचा अनुभव असल्यामुळे खडतर वातावरणात फलंदाजी करण्याचा अनुभवही त्याच्याकडे आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये चेतेश्वर पुजाराच्या फलंदाजीत आपल्याला सुधारणा झालेली पहायला मिळते, असं म्हणत गौतम गंभीरने चेतेश्वर पुजाराच्या खेळाचं कौतुक केलं.