खेळाच्या विकासासाठी जागतिक पुरुष आणि महिला संघटनांनी एकत्र येत काम करण्याचे ठरवले आहे. नव्या वर्षांपासून व्यावसायिक स्क्वॉश असोसिएशनमध्ये (पीएसए) महिला स्क्वॉश असोसिएशनचे (डब्ल्यूएसए) विलीनीकरण करण्यात येणार आहे.
गेल्या दहा महिन्यांपासून या विलीनीकरणासंदर्भात सनदशीर प्रक्रिया सुरू होती. यामध्ये खेळाशी निगडित विविध घटकांचा सल्ला विचारात घेण्यात आला. पीएसए आणि डब्ल्यूएसएशी संलग्न सर्व संघटनांची भूमिकेवरही चर्चा झाली आणि २८ ऑक्टोबरला एकत्रीकरणावर शिक्कामोर्तब झाले. यानुसार प्रोफेशनल स्क्वॉश असोसिएशन या झेंडय़ाखाली दोन्ही संघटना काम करणार आहेत. नवनियुक्त संयुक्त संघटना खेळाची व्याप्ती वाढवण्यासाठी प्रयत्नशील असेल. बक्षीस रकमेत समानता यावी यासाठी संयुक्त संघटना पुढाकार घेईल.
‘‘पुरुष तसेच महिला खेळाडूंना समान संधी मिळाव्यात आणि बक्षीस रकमेत समानता यावी यासाठी योजना आखू,’’ असे पीएसएचे मुख्य कार्यकारी अधिकारी अलेक्स गॉग यांनी सांगितले.