‘आपला खेळ  भारी, आपली किक भारी, आपले सगळेच लय भारी,’ अशा आविर्भावात खेळणाऱ्या जर्मनीने ब्राझीलच्या स्वप्नांचा अक्षरश: चुराडा केला. घरच्या मैदानावर विश्वचषक उंचावण्याचे स्वप्न मनाशी बाळगत, स्टार खेळाडू नेयमारची दुखापत व कर्णधार थिआगो सिल्वाची अनुपस्थिती अशा दु:खद वातावरणात खेळणाऱ्या ब्राझीलला फिफा विश्वचषकातील सर्वात दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. उपान्त्य फेरीत जर्मनीचे जेतेपदासाठी दावेदार असणाऱ्या ब्राझीलचा ७-१ असा धुव्वा उडवला. जर्मनीकडून प्रत्येक गोल स्वीकारताना ब्राझीलचे खेळाडूच नव्हे तर चाहतेही हृदयावर घाव झेलत होते. या मानहानीकारक पराभवामुळे ब्राझीलवर शोककळा पसरली असून १९५०साली विश्वचषक गमावल्याचे दु:ख पचवणे सोपे होते, अशी प्रत्येक ब्राझीलवासीयाची भावना आहे.
जर्मनीकडून ७-१ असा पराभव स्वीकारल्यानंतर ब्राझीलची ‘फुटबॉलमधील महासत्ता’ ही प्रतिमा आता डागाळली गेली आहे. जर्मनीने या विजयासह आठव्यांदा विश्वचषकाची अंतिम फेरी गाठण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी ब्राझीलमधील मुख्य रस्त्यांवर मोठय़ा स्क्रीनवर सामने पाहण्यासाठी तोबा गर्दी जमली होती. पण सहा मिनिटांच्या अंतराने जर्मनीकडून चार गोल स्वीकारल्यामुळे ब्राझीलची वाताहत झाली. मैदानावर व संपूर्ण ब्राझीलमध्ये सन्नाटा पसरला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच ब्राझीलचे राष्ट्रगीत गात आपल्या संघाला पाठिंबा देणाऱ्या चाहत्यांमधून रडण्याचे आवाज ऐकू येऊ लागले. प्रत्येकाचे डोळे पाण्याने डबडबले होते. कुणालाही आपल्या संघाची ही केविलवाणी अवस्था पाहवत नव्हती. स्टेडियममध्ये तर अश्रूंचा पूर वाहू लागला होता.
घरच्या मैदानावर ब्राझीलला इतक्या वाईट पराभवाला सामोरे जावे लागेल आणि दोन बलाढय़ संघांमध्ये रंगलेल्या विश्वचषकाच्या उपान्त्य फेरीत आठ गोल होतील, याची कुणी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. नेयमार आणि सिल्वाविना खेळणारा ब्राझीलचा संघ मायदेशातील चाहत्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणण्यासाठी सज्ज झाला होता. जर्मनीचा संघ २००२च्या अंतिम फेरीतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी उत्सुक होता. पण सामन्याला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या ३० मिनिटांमध्येच जर्मनीने पाच गोल लगावून सामना आपल्या बाजूने झुकवला. मिरोस्लाव्ह क्लोसने २३व्या मिनिटाला या स्पर्धेतील दुसरा गोल झळकावून विश्वचषकात सर्वाधिक गोल रचण्याचा विश्वविक्रम प्रस्थापित केला. त्याने ब्राझीलच्या रोनाल्डोचा १५ गोलांचा विक्रम मागे टाकला होता. पण ब्राझीलसारख्या दिग्गज संघाच्या मानहानीकारक पराभवामुळे क्लोसचा विक्रमही झाकोळला गेला.
थॉमस म्युलरने ११व्या मिनिटाला गोल करत जर्मनीचे खाते खोलले. त्यानंतर १२ मिनिटांनी मिरोस्लाव्ह क्लोसने दुसरा गोल करत जर्मनीची आघाडी २-०ने वाढवली. दोन मिनिटांच्या अंतराने टोनी क्रूसने (२४व्या व २६व्या मिनिटाला) दोन गोल झळकावत ब्राझीलच्या बचावफळीची लक्तरे वेशीवर टांगली. त्यानंतर २९व्या मिनिटाला सॅमी खेडिराने आणखी एक गोल झळकावत जर्मनीला
५-० असे आघाडीवर आणले. क्लोसच्या जागी दुसऱ्या सत्रात मैदानावर उतरलेल्या आंद्रे शुरलेने ६९व्या आणि ७९व्या मिनिटाला असे दोन गोल करत ब्राझीलला मोठय़ा संकटात ढकलले. पण ऑस्करने ९०व्या मिनिटाला ब्राझीलचे खाते खोलत घरच्या चाहत्यांसमोर देशाची अब्रू वाचवण्याचा प्रयत्न केला. विश्वचषकाच्या उपान्त्य फेरीत पहिल्या सत्रात पाच गोल स्वीकारणारा ब्राझील हा पहिला संघ ठरला आहे.
माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट दिवस -स्कोलारी
बेलो होरिझोंटे : प्रशिक्षक लुईझ फेलिपे स्कोलारी यांनी ब्राझीलच्या दारुण पराभवाची जबाबदारी स्वीकारली असली तरी ब्राझीलला सर्वात वाईट दिवस आणून देणारे स्कोलारी नव्या वादात अडकले आहेत. ‘‘माझ्या मते, हा माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट दिवस असावा. ब्राझीलचा ७-१ असा पराभव झालेले प्रशिक्षक, अशी माझी ओळख स्मरणात राहील. पण प्रशिक्षकपदाची सूत्रे हाती घेतली, त्या वेळीच मला या धोक्याची कल्पना आली होती. पण आम्ही आमच्या परीने सर्वोत्तम खेळ करण्याचा प्रयत्न केला, असेच मी ब्राझीलच्या चाहत्यांना सांगू इच्छितो,’’ असे स्कोलारी यांनी सांगितले.
विश्वविक्रमी क्लोस!
ब्राझीलविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात दुसरा गोल झळकावत जर्मनीच्या मिरोस्लाव्ह क्लोसने विश्वचषकात १६ गोल रचण्याचा विश्वविक्रम आपल्या नावावर केला. याचप्रमाणे सलग चार वेळा उपांत्य सामन्यात खेळणारा क्लोस हा जगातील पहिला फुटबॉलपटू ठरला आहे. ३६ वर्षीय क्लोसने ब्राझीलच्या रोनाल्डोने रचलेला १५ गोलांचा विक्रम ब्राझीलविरुद्ध मोडीत काढला. विशेष म्हणजे, ज्या सामन्यात क्लोसने गोल केला आहे, त्या सामन्यात जर्मनीचा संघ पराभूत झालेला नाही. विश्वचषकातील २३ सामन्यांत त्याच्या नावावर १६ गोल जमा झाले आहेत.