सामन्याच्या ८९व्या मिनिटाला नोआह अवुकूने केलेल्या गोलमुळेच बलाढय़ जर्मनीने कोस्टा रिकाला २-१ असे हरवले आणि कुमार विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत शानदार सलामी केली.

जर्मनीने वरिष्ठ गटात अनेक वेळा विश्वचषक स्पर्धा जिंकली आहे. मात्र त्यांना कुमार गटात हे यश मिळवता आलेले नाही. यंदा हे विजेतेपद मिळवण्याच्या निर्धाराने जर्मनीचा संघ उतरला आहे. सामन्याच्या २१व्या मिनिटाला त्यांचा कर्णधार जॅन फिटे अर्पने खाते उघडले. पूर्वार्धात याच गोलाच्या आधारे त्यांनी आघाडी घेतली होती. परंतु ६४व्या मिनिटाला कोस्टा रिकाच्या आंद्रेस गोमेझने अप्रतिम गोल केला व १-१ अशी बरोबरी साधली. हा सामना याच बरोबरीत संपणार असे वाटत असतानाच ८९व्या मिनिटाला जर्मनीच्या नोआह अवुकूने सुरेख फटका मारला व संघाला २-१ अशी महत्त्वपूर्ण आघाडी मिळवून दिली. त्याने मारलेला फटका कोस्टा रिकाचा गोलरक्षक फर्नान फेरॉनला अडवता आला नाही.

बलाढय़ जर्मनीच्या खेळाडूंनीच या सामन्यात वर्चस्व गाजवले. जरी त्यांनी एक गोल स्वीकारला तरी त्यांच्या खेळाडूंनी सातत्याने चाली करीत नियंत्रण राखले होते. गोल करण्याच्या अचूकतेअभावी त्यांचे हे प्रयत्न असफल ठरले.

क गट

जर्मनी                                                     कोस्टा रिका

२                                                                 १

जॅन फिटे अर्प २१’                                    आंद्रेस गोमेझ ६४’

नोआह अवुकू ८९’