ब्राझीलला घरच्या मैदानावर ७-१ असे पराभूत करून जर्मनीने फक्त २० कोटी ब्राझीलवासीयांनाच नव्हे तर जगभरातील ब्राझीलच्या तमाम चाहत्यांना मोठा धक्का दिला. जर्मनीचा संघ या विजयात, जल्लोषात न्हाऊन निघत असताना प्रशिक्षक जोकिम लो मात्र ‘टचलाइन’वरच उभे होते. त्यांना पुढच्या खडतर आव्हानाची जाणीव झाली होती. याआधी सात वेळा अंतिम फेरीत मजल मारूनही फक्त तीन वेळाच त्यांना जेतेपदावर नाव कोरता आले होते, हा इतिहास त्यांच्या डोळ्यांसमोर तरळू लागला. १९९०मध्ये अखेरचे जेतेपद पटकावल्यानंतर जवळपास पाच वेळा जर्मनीने किमान उपांत्यपूर्व फेरीपर्यंतचा टप्पा सहजपणे ओलांडला. पण विश्वचषक उंचावण्याचे त्यांचे स्वप्न अधुरेच राहिले. या आठवणीने जोकिम लो पुन्हा अस्वस्थ झाले.
गौरवशाली इतिहास असूनही जर्मनीला फुटबॉलमध्ये सोनेरी यश मिळवता आले नाही. युवा जोश, उत्तम आक्रमण आणि सर्वोत्तम तांत्रिक क्षमता असा सर्वागसुंदर खेळ जर्मनीला लाभला नव्हता. पण जिंकण्याचा मार्ग त्यांना अवगत होता. गेल्या काही वर्षांत बचाव आणि आक्रमण अशा आघाडय़ांवर कमालीची सुधारणा जर्मनीने घडवून आणली. अल्जेरियाविरुद्धचा बाद फेरीचा सामना वगळल्यास, बाकीच्या सर्व सामन्यांमध्ये जर्मनीने ते दाखवून दिले. फ्रान्सविरुद्ध सुरुवातीलाच गोल करून नंतर त्यांनी भक्कम बचाव करून सामना जिंकला. या विश्वचषकात आतापर्यंत जर्मनीने तब्बल १७ गोल केले आहेत. गेल्या तीन विश्वचषकांमध्ये संपूर्ण स्पर्धेदरम्यान त्यांना अशी कामगिरी करता आली नव्हती. पण या वेळी त्यांनी बर्लिनच्या भिंतीप्रमाणे भक्कम बचाव करत फक्त चार गोल स्वीकारले आहेत.
२०००च्या युरो चषकात साखळी फेरीतच गाशा गुंडाळावा लागल्यानंतर जर्मनीने युवा खेळाडूंचा विकास आणि आक्रमण खेळावर लक्ष केंद्रित केले. जर्मनीतील ३६ व्यावसायिक क्लबमध्ये युवा अकादमी स्थापन करण्यात आल्या. १० वर्षांच्या खडतर परिश्रमानंतर जर्मनीला थॉमस म्युलर, बास्तियन श्वाइनस्टायगर, फिलिप लॅम, मारिओ गोएट्झे आणि मॅन्युएल न्युअरसारखे अव्वल खेळाडू मिळाले. २००९मध्ये जर्मनीच्या २१ वर्षांखालील संघाने युरोपियन चषकाचे जेतेपद पटकावले. त्या संघातील न्युअर, बेनेडिक्ट होवेडस, जेरोम बोटेंग, मॅट्स हमेल्स, सॅमी खेडिरा आणि मेसूत ओझिल हे सहा खेळाडू सध्या जर्मनीचे प्रतिनिधित्व करताहेत. त्यांच्या जोडीला म्युलर, टोनी क्रूस आणि गोएट्झे या दिग्गज खेळाडूंसह मिरोस्लाव्ह क्लोस, श्वाइनस्टायगर आणि लॅम हे अनुभवी खेळाडू जर्मनीला सोनेरी दिवस मिळवून देतील, अशी आशा बाळगली जात आहे. जर्मन फुटबॉलची एक नवी पिढी तयार झाली असून बायर्न म्युनिक आणि बोरूसिया डॉर्टमंड या संघाद्वारे ते युरोपियन फुटबॉलमध्ये जर्मनीची पताका अभिमानाने फडकावत आहेत.
इंग्लिश प्रीमिअर लीगमध्ये चमकणारे इंग्लिश फुटबॉलपटू केवळ दडपणामुळे त्यांच्या देशाचे प्रतिनिधित्व करतात. पण जर्मनीचे खेळाडू अभिमानाने देशाचे प्रतिनिधित्व करतात. जर्मनीचा संघ फुटबॉलमध्ये महासत्ता म्हणून ओळखला जावा, हीच त्यांची एकमेव अपेक्षा आहे. पोलंडमध्ये जन्मलेल्या मिरोस्लाव्ह क्लोसने जर्मनीतर्फे खेळताना सर्वाधिक १६ गोलांचा विश्वविक्रम रचला. आता युवा अकादमींमध्ये घडलेली जर्मनीची नवी पिढी आंतरराष्ट्रीय फुटबॉलवर अधिराज्य गाजवण्यासाठी सरसावली आहे.