गेला महिनाभर सुरू असलेला विश्वविजेतेपदापर्यंतचा प्रवास आता अंतिम टप्प्यात येऊन ठेपला आहे. दक्षिण अमेरिकेतील अर्जेटिना आणि युरोपमधील जर्मनी हे फुटबॉलमधील महासत्ता समजले जाणारे संघ तिसऱ्यांदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत एकमेकांशी रविवारी ऐतिहासिक मॅराकाना स्टेडियमवर भिडणार आहेत. जर्मनी २४ वर्षांनंतर, तर अर्जेटिना संघ २८ वर्षांनंतर जेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी उत्सुक आहे. अर्जेटिनाला जेतेपद मिळवून देत महान खेळाडूंच्या पंक्तीत लिओनेल मेस्सी स्थान मिळवणार, की दक्षिण अमेरिकन भूमीत जेतेपद मिळवणारा पहिला युरोपीयन संघ बनण्याचा मान जर्मनी पटकावणार, याकडे फुटबॉलविश्वाचे लक्ष लागले आहे. या महामुकाबल्याच्या निमित्ताने जगभरातील चाहत्यांना एका थरारक लढतीचा आस्वाद घेता येणार आहे.
जेतेपदासाठी प्रबळ दावेदार समजल्या जाणाऱ्या यजमान ब्राझीलच्या ७-१ अशा चिंधडय़ा उडवणाऱ्या जर्मनीचे ‘हौसले बुंलद’ आहेत, तर दुसरीकडे विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच अर्जेटिनाला उपांत्य फेरीत गोलशून्य बरोबरीवर समाधान मानावे लागले. पण पेनल्टी-शूटआऊटमध्ये मेस्सी आणि कंपनीने नेदरलँड्सवर विजय मिळवत १९९०नंतर प्रथमच अंतिम फेरीत धडक मारली. मेस्सीने आपल्या सर्वागसुंदर खेळाने स्पेन आणि युरोपीयन क्लबवर अधिराज्य गाजवले आहे. चार वेळा जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूचा पुरस्कार पटकावणाऱ्या मेस्सीच्या खात्यात फक्त विश्वचषकाची भर पडलेली नाही. त्यामुळेच पेले, रोनाल्डो, झिनेदिन झिदान आणि दिएगो मॅराडोना या महान फुटबॉलपटूंच्या पंक्तीत स्थान मिळवण्यासाठी तो उत्सुक आहे.
फॉर्म, दर्जा आणि गुणवत्ता याबाबतीत जर्मनी आणि अर्जेटिना हे फुटबॉल संघ एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. गेल्या चार विश्वचषक स्पर्धामध्ये उपांत्य फेरीत किंवा अंतिम फेरीत पराभूत व्हावे लागल्यामुळे आता मॅराकाना स्टेडियमवर इतिहास रचण्यासाठी जर्मनीचा संघ उत्सुक आहे. यजमान ब्राझीलला घरचा रस्ता दाखवल्यानंतर आता अर्जेटिनावरही मात करण्यासाठी जोकिम लो यांच्या प्रशिक्षकपदाखालील जर्मनी संघ सज्ज झाला आहे. उपांत्य फेरीच्या जर्मनीच्या संघात कोणतेही बदल न करण्याचे जोकिम लो यांनी ठरवले आहे. थॉमस म्युलर, मिरोस्लाव्ह क्लोस हे आघाडीवीर, मेसूत ओझिल, टोनी क्रूस व आंद्रे शुरले हे मधल्या फळीत आणि बास्तियन श्वाइनस्टायगर, सॅमी खेडिरा, फिलिप लॅम हे बचाव फळीत आणि मॅन्युएल न्यूअरसारखा गोलरक्षक असा जर्मनीचा संघ असणार आहे.
अर्जेटिनाचे प्रशिक्षक अलेजांड्रो सबेला यांना मात्र अँजेल डी मारिया दुखापतीतून सावरण्याची चिंता लागून राहिली आहे. अर्जेटिनाचा संघ मेस्सीवर अवलंबून असला तरी त्यांच्या बचाव फळीने नेदरलँड्सच्या दिग्गज आक्रमकवीरांना रोखून धरले होते. जेवियर मॅस्चेरानो याने आर्येन रॉबेनचा फटका परतवून लावत अर्जेटिनाला धोक्याच्या स्थितीतून बाहेर काढले होते. त्यामुळे या सामन्यातही त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे. मेस्सीसह गोंझालो हिग्युएन आणि सर्जिओ अ‍ॅग्युरो हे कितपत यशस्वी ठरतात, यावर अर्जेटिनाचा विश्वचषकाचा निकाल अवलंबून असणार आहे.

आमने-सामने     
सामने : ६   
जर्मनी : ४
अर्जेटिना : १
बरोबरी : १

गोलपोस्ट
ब्राझीलविरुद्ध आम्ही खेळाचा आनंद लुटला. या सामन्यात मी विश्वविक्रम रचला असला तरी मी माझे लक्ष अर्जेटिनाविरुद्धच्या अंतिम सामन्याकडे केंद्रित केले आहे. आमचा आत्मविश्वास वाढला असून या सामन्यातही गोल करण्याचे माझे उद्दिष्ट आहे. या सामन्यातही आम्ही सर्वोत्तम खेळ करण्याचा प्रयत्न करणार आहोत. अंतिम सामन्यानंतर मी निवृत्त होईन की नाही, हे मलाही माहीत नाही.
मिरोस्लाव्ह क्लोस, जर्मनीचा आघाडीवीर

आमच्यापेक्षा एक दिवस जास्त विश्रांती घेण्याची संधी जर्मनीला मिळाली आहे. त्याचबरोबर त्यांना एकदाही अतिरिक्त वेळेत खेळावे न लागल्यामुळे त्यांचे पारडे निश्चितच जड असणार आहे. पण अथक परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर आम्ही विजेतेपद मिळवण्याचा प्रयत्न करू. जर्मनीचे आव्हान सहजपणे पार करणे सोपे नाही. हा सामना खडतर असणार आहे, याची आम्हाला कल्पना आहे.
अलेजांड्रो सबेला, अर्जेटिनाचे प्रशिक्षक
मेस्सीला रोखण्यासाठी जर्मनीची व्यूहरचना
साओ पावलो : नेदरलँड्सविरुद्ध लिओनेल मेस्सीला आपला करिश्मा दाखवता आला नाही. अर्जेटिनाचा संघ एकटय़ा मेस्सीवर अवलंबून असल्यामुळे मेस्सीला रोखण्यासाठी जर्मनीने विशेष व्यूहरचना आखली आहे. ‘‘नेदरलँड्सच्या दोन जणांनी मेस्सीला रोखले होते, पण त्याला गोल करता न यावा, यासाठी नेदरलँड्सपेक्षाही विशेष अशी रणनीती आमच्याकडे आहे. एकटा मेस्सी वि. ११ जणांचा जर्मनी असा हा सामना रंगणार आहे,’’ असे सांगत जर्मनीचे सहप्रशिक्षक हॅन्सी फ्लिक यांनी ही रणनीती उघड करणे मात्र टाळले.
‘‘अर्जेटिना संघाविषयी आम्हाला बरीच माहिती आहे. त्यामुळे जर्मनीचा संघ इतिहास घडवण्यासाठी सज्ज झाला आहे. पोर्तुगालविरुद्धच्या सामन्यात आम्ही ज्याप्रमाणे ख्रिस्तियानो रोनाल्डोला निष्प्रभ केले होते, त्याचप्रमाणे मेस्सीला रोखण्याचा आमचा विचार आहे. मेस्सी हा जगातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. त्यामुळे आम्ही ११ जण त्याला रोखण्याचा प्रयत्न करणार आहोत. मेस्सीला गोल करणे किंवा गोल करण्याच्या संधी निर्माण करू न देणे, हाच आमचा प्रयत्न असणार आहे. ब्राझीलविरुद्ध आम्ही दणदणीत विजय मिळवला. मात्र तीच कामगिरी अंतिम सामन्यातही आमच्याकडून व्हावी, अशी अपेक्षा चाहत्यांनी बाळगू नये,’’ असे त्यांनी सांगितले.

जर्मनी
फिफा क्रमवारीतील स्थान :  २
प्रतिष्ठेच्या स्पर्धामध्ये अखेरच्या टप्प्यात खेळण्याचा चांगला अनुभव असल्यामुळे जर्मनीच विश्वविजेतेपद पटकावेल, असा विश्वास आहे. जर्मनीचे फुटबॉलपटू गुणी आणि परिपक्व आहेत. संघातील खेळाडू हे दिग्गज क्लबचे आधारस्तंभ आहेत. आमचा आत्मविश्वास गगनाला भिडला असून जर्मनीला पुन्हा सोनेरी दिवस मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
-फिलिप लॅम, जर्मनीचा कर्णधार

अर्जेटिना
फिफा क्रमवारीतील स्थान :  ५
अर्जेटिनाचा संघ विश्वविजेता होण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहे. आतापर्यंतचा आमचा प्रवास सुरेख झाला आहे. या संघाचा एक भाग असल्याचा अभिमान वाटत आहे. या क्षणी मी फक्त खेळाचा आनंद लुटत आहे. प्रतिस्पर्धी कोणताही असो, आम्ही कुणालाही घाबरत नाही. आता फक्त विश्वचषक जिंकण्याकडेच आम्ही लक्ष केंद्रित केले आहे.
-लिओनेल मेस्सी, अर्जेटिनाचा कर्णधार

मॅच स्टॅट्स
८ जर्मनीचा संघ सर्वाधिक आठव्यांदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. गेल्या सात दशकांत (१९५४, १९६६, १९७४, १९८२, १९८६, १९९०, २००२, २०१४) जर्मनीने एकदा तरी अंतिम फेरीत धडक मारली आहे.

३ अर्जेटिना आणि जर्मनी यांच्यात रंगणारा हा विश्वचषक स्पर्धेतील तिसरा अंतिम सामना आहे. याआधी अर्जेटिनाने १९८६च्या अंतिम फेरीत जर्मनीला ३-२ असे पराभूत केले होते. जर्मनीने १९९०मध्ये अर्जेटिनावर १-० असा विजय मिळवत चार वर्षांनंतर पराभवाचे उट्टे फेडले होते.

५ अर्जेटिनाने आतापर्यंत एकूण पाच वेळा विश्वचषक स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. अर्जेटिनाने १९७८ आणि १९८६मध्ये विश्वचषकाचे जेतेपद पटकावले होते. तर १९३० आणि १९९०मध्ये त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.

१७ जर्मनीने अंतिम फेरीत मजल मारेपर्यंत अन्य संघांच्या तुलनेत सर्वाधिक गोल केले आहेत. जर्मनीने आतापर्यंत तब्बल १७ गोल लगावले आहेत. अर्जेटिनाने आठ गोल करत अंतिम फेरी गाठली आहे.

० अर्जेटिनाने बाद फेरीत आतापर्यंत एकही गोल स्वीकारलेला नाही. संपूर्ण स्पर्धेत त्यांनी आतापर्यंत फक्त तीन गोल प्रतिस्पध्र्याकडून स्वीकारले आहेत. जर्मनीने बाद फेरीत दोन आणि साखळी फेरीतही दोन गोल स्वीकारले आहेत.

स्थळ : इस्टाडिओ मॅराकाना, रिओ दी जानिरो
वेळ : मध्यरात्री १२.३० वा. पासून