सातत्यपूर्ण खेळाचा कस

विश्वचषक विजेता जर्मनी आणि कोपा अमेरिका स्पध्रेतील विजेता चिली हे दोन संघ कॉन्फेडरेशन चषक फुटबॉल स्पध्रेत गुरुवारी समोरासमोर येणार आहेत. ‘ब’ गटात स्थान देण्यात आलेल्या या संघाने स्पध्रेत विजयाने सुरुवात केली आहे. त्यामुळे जर्मनी व चिली यांच्यातील लढतीत सातत्यपूर्ण खेळाचा कस लागणार आहे. रशिया येथील कझान स्टेडियमवर हे दोन्ही संघ गटातील अव्वल स्थानावरील पकड मजबूत करण्यासाठी एकमेकांविरुद्ध उतरणार आहेत.

स्पध्रेतील पहिल्या सामन्यात चिलीने २-० अशा फरकाने कॅमेरूनवर सहज विजय मिळवला, तर जर्मनीला ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३-२ असा विजय मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला. आक्रमकता ही या दोन्ही संघांची जमेची बाजू आहे आणि त्यामुळे या लढतीत गोल्सचा पाऊस अपेक्षित आहे. जर्मनीने गेल्या तीन लढतींत चिलीविरुद्ध विजय मिळवले आहेत आणि हे तिन्ही सामने फिफा विश्वचषक स्पध्रेतील आहेत.

या लढतीच्या निमित्ताने क्लबमधील सहकाऱ्यांविरुद्ध खेळताना अनेक खेळाडू पाहायला मिळतील. चिलीचा आर्टुरो व्हिडाल हा त्याच्या बायर्न म्युनिचचा सहकारी जोशुआ किम्मिचविरुद्ध खेळेल. असाच मुकाबला सेबॅस्टियन रुडी (जर्मनी) आणि निक्लास स्युले (चिली) या म्युनिच क्लबच्या, तर शकड्रॅन मुस्ताफी (जर्मनी) आणि अ‍ॅलेक्सिस सांचेज (चिली) या आर्सेनल क्लबच्या सहकाऱ्यांमध्ये बघायला मिळणार आहे.

कॅमेरून व ऑस्ट्रेलिया विजयाच्या प्रतीक्षेत

कॅमेरून व ऑस्ट्रेलिया यांच्यात चुरशीचा सामना पाहायला मिळणार आहे. ‘ब’ गटातील या दोन्ही संघांना सलामीच्या लढतीत अनुक्रमे चिली आणि जर्मनीकडून पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे स्पध्रेतील आव्हान कायम राखण्यासाठी त्यांच्यासाठी हा आरपारचा सामना आहे.

आजचे सामने

  • कॅमेरून वि. ऑस्ट्रेलिया ;वेळ : रात्री ८.३० वाजल्यापासून
  • जर्मनी वि. चिली ; वेळ : रात्री ११.३० वाजल्यापासून
  • थेट प्रक्षेपण : सोनी सिक्स व टेन २.