ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टिव्ह स्मिथसह अष्टपैलू खेळाडू स्टॉयनिसने भारतीय फलंदाजीला रोखणे आव्हानात्मक असल्याचे मालिकेपूर्वी म्हटले. मालिकेत विराटला लवकरात लवकर बाद करणे ही विजयाची गुरुकिल्ली असेल, असे देखील स्मिथ यावेळी म्हणाला. ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी मालिकेपूर्वी केलेल्या या वक्तव्यानंतर माजी गोलंदाज जेसन गिलेस्पी यांनी आपल्या टीमला विराटला बाद करण्याचा मंत्र सांगितला आहे.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये गिलेस्पी म्हणाले की, स्लेजिंगने विराट कोहलीचे लक्ष विचलित करण्यापेक्षा अचूक गोलंदाजी करुन त्याला रोखण्यावर ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी भर द्यायला हवा. कोहली हा उत्तम फलंदाज आहे. तो मैदानात आरामात खेळतो. त्यामुळे त्याच्यापुढे स्लेजिंग करण्यापेक्षा अचूक गोलंदाजी करत त्याच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करा. अचूक टप्प्यासह बाऊन्सरचा मारा करुन विराटला बॅकपूटवर ढकलणे शक्य आहे. पुढे येवून खेळण्यास प्रवृत्त करुन त्याला बाद करण्याची संधी निर्माण करता येईल. तो कोणत्या पट्ट्यातील चेंडूवर अप्रतिम खेळ करतो याचा अभ्यास करुन त्याला हवा असणारा चेंडू टाकणे टाळा, असा सल्ला गिलेस्पी यांनी ऑस्ट्रेलियन टीमला दिला.

आगामी वनडे मालिकेत मुख्य गोलंदाज मिचेल स्टार्कच्या अनुपस्थिबद्दल गिलेस्पी म्हणाले की, त्याची अनुपस्थिती इतर गोलंदाज भरुन काढतील. केमिन्सला संघात स्थान मिळाले असले तरी पाच सामन्यांच्या मालिकेतील दोन ते तीन सामन्यात त्याला संधी मिळेल. यावेळी त्यांनी भारतीय गोलंदाज मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव आणि जसप्रीत बुमराह यांचेही कौतुक केले. ऑस्ट्रेलियन टीमसमोर आव्हानात्मक गोलंदाजी करण्याची या चौघांमध्ये क्षमता आहे, असे ते म्हणाले.