पाकिस्तानच्या सैन्याने भारताच्या दोन जवानांना ठार मारल्यामुळे दोन्ही देशांतील वातावरण बिघडले असताना, त्याचा परिणाम खेळाच्या मैदानावरही जाणवू लागला आहे. हॉकी इंडिया लीगमध्ये नऊ पाकिस्तानी खेळाडूंचा सहभाग असल्यामुळे हॉकी इंडियावरही टीकेची झोड उठत आहे. त्यामुळे हॉकी इंडियाने वाढता दबाव लक्षात घेऊन पाकिस्तानच्या नऊ खेळाडूंना मायदेशी परत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
‘‘भारतातील तणावग्रस्त परिस्थितीबाबत पाच फ्रॅन्चायझीमधील सर्व भागीदार, हॉकी इंडियाचे पदाधिकारी आणि पाकिस्तान हॉकी महासंघाशी (पीएचएफ) चर्चा केल्यानंतरच सर्वानी एकमताने हा निर्णय घेतला आहे,’’ असे हॉकी इंडियाचे महासचिव नरिंदर बात्रा यांनी सांगितले.
‘‘या मोसमासाठी करारबद्ध करण्यात आलेली रक्कम पाकिस्तानी खेळाडूंना देण्यात येईल. हॉकी इंडिया त्याबाबत कटिबद्ध असेल. खेळाडूंना मानसिक त्रास होऊ नये आणि त्याचा त्यांच्या कामगिरीवर परिणाम होऊ नये, यासाठी आम्ही हा निर्णय घेतला. या खेळाडूंच्या जागी बदली खेळाडू निवडण्याचे अधिकार फ्रॅन्चायझींना देण्यात आले आहेत. राखीव खेळाडूंमधून फ्रॅन्चायझींना उर्वरित रकमेतून खेळाडू निवडता येतील,’’ असे बात्रा यांनी सांगितले.
पाकिस्तानच्या खेळाडूंना मुंबईत खेळू देणार नाही, असा इशारा शिवसेनेने दिल्यानंतर मुंबई मॅजिशियन्स संघाने आपला तळ मुंबईहून नवी दिल्लीत हलवला होता. हॉकी इंडियाने सुरुवातीला मुंबई मॅजिशियन्स संघातील चार पाकिस्तानी खेळाडूंना मायदेशी पाठवण्याचा निर्णय घेतला होता. पण स्पर्धेत कोणताही व्यत्यय येऊ नये, यासाठी सर्वच पाकिस्तानी हॉकीपटूंना पाकिस्तानात पाठवण्यात आले आहे.
महमूद रशीद, फारीद अहमद, मुहम्मद तौसिक, इम्रान बट (सर्व मुंबई मॅजिशियन्स), मोहम्मद रिझवान सिनियर आणि मोहम्मद रिझवान ज्युनियर (दिल्ली वेव्हरायडर्स), काशीफ शाह (जेपी पंजाब वॉरियर्स) तसेच मुहम्मद इरफान आणि शाफकत रसूल (रांची ऱ्हिनोस) ही पाकिस्तानच्या खेळाडूंची नावे आहेत.