भारतामध्ये क्रिकेट हा धर्म समजला जातो आणि क्रिकेटपटू देव. या भारतीय क्रिकेटमधल्या देवांच्या वृत्तीवर इंग्लंडचा माजी कर्णधार नासीर हुसैनने टीका करत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
कोलकात्यातील पराभवानंतर भारतीय संघातील देवासमान वाटणाऱ्या खेळाडूंच्या वृत्तीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. जेव्हा कर्णधार महेंद्रसिंग धोनी, गौतम गंभीर आणि संघातील काही वरिष्ठ खेळाडू जेव्हा कोलकात्यातील पराभवानंतर हॉटेलमध्ये गेले तेव्हा त्यांना हा पराभव किती बोचला ? खेळाबद्दलची किती भूक त्यांच्यामध्ये आहे. करोडपती झालेल्या खेळाडूंची खेळाबद्दलची मानसिक आणि शारीरिक भूक अजूनही कायम आहे का ? या परीस्थितीचा हे खेळाडू खोलवर विचार करतील का? असे प्रश्न हुसैन यांनी एका मुलाखतीदरम्यान विचारले आहेत.
ते पुढे म्हणाले की, भारताचे प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांनी धोनी, गंभीर, वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर यांच्या डोळ्यात पाहून त्यांच्यामध्ये खेळाबद्दलची किती भूक आहे ती पहावी. भारताने अखेरच्या कसोटी सामन्यासाठी झहीर खान, युवराज सिंग आणि हरभजन सिंग यांना डच्चू दिला आहे, पण भारतीय खेळाडूंमध्ये सध्याची जी वृत्ती आहे ती बदलायला हवी.