आशियाई क्रीडा स्पर्धेतील गेल्या सहा दिवसांपासूनचा सुवर्णदुष्काळ अखेर शनिवारी संपुष्टात आला. तिरंदाजी आणि स्क्वॉश या खेळात ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या भारतासाठी आशियाई स्पर्धेतील आठवा दिवस ‘अजि सोनियाचा दिनु’ असाच ठरला. पुरुष तिरंदाजांनी बलाढय़ कोरियाचा पाडाव करत भारताला तिरंदाजीतील पहिलेवहिले सुवर्णपदक मिळवून दिल्यानंतर स्क्वॉशमध्ये पुरुषांनी ऐतिहासिक सुवर्णपदकावर नाव कोरले. तिरंदाजपटू अभिषेक वर्मा, मुंबईची धावपटू ललिता बाबर आणि महिला स्क्वॉशपटूंनी मिळवलेल्या रौप्यपदकामुळे भारताच्या आनंदात आणखी भर पडली. भारताने शनिवारी दोन सुवर्ण, तीन रौप्य आणि सहा कांस्य अशी एकूण ११ पदके मिळवत गुणतालिकेत ११व्या स्थानी झेप घेतली आहे.
तिरंदाजांची ऐतिहासिक कामगिरी!
सांघिक सुवर्णपदकासह अभिषेकला रौप्य आणि सांघिक तसेच त्रिशाला कांस्यपदक
तिरंदाजी
भारतीय तिरंदाजांनी आशियाई स्पर्धेत शनिवारी इतिहास रचला. पुरुष संघाने कम्पाउंड प्रकारात भारताला ऐतिहासिक सुवर्णपदक मिळवून दिल्यानंतर अभिषेक वर्माचे रौप्यपदक आणि दोन कांस्यपदके मिळवत भारताने तिरंदाजीत पदकांची लयलूट केली. महिला संघाने कम्पाउंड प्रकारात इराणचा पराभव करून कांस्यपदकावर नाव कोरल्यानंतर त्रिशा देब हिने वैयक्तिक प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली.
यापूर्वी भारताने आशियाई स्पर्धेत तिरंदाजीमध्ये एक रौप्य आणि तीन कांस्यपदके अशी कमाई केली होती. पण कम्पाउंड प्रकारात पटकावलेले सुवर्ण हे भारतीय तिरंदाजांचा आत्मविश्वास उंचावणारे ठरले. रजत चौहान, संदीप कुमार आणि अभिषेक वर्मा यांच्या भारतीय संघाने बलाढय़ कोरियाचा २२७-२२५ असा पराभव करून सुवर्णपदकाला गवसणी घातली. गेयँग तिरंदाजी स्टेडियममध्ये वारा वाहत असला तरी भारतीय तिरंदाजांचे लक्ष विचलित झाले नाही. सहा बाणांच्या पहिल्या फेरीनंतर भारताने ५५-५४ अशी निसटती आघाडी घेतली होती. त्यानंतर दुसऱ्या फेरीत भारतीय संघ ११३-१११ असा आघाडीवर होता. तिसऱ्या फेरीत १९९-१९६ अशी आघाडी भारताने घेतल्यानंतर कोरियाच्या एका खेळाडूने चौथ्या फेरीत ७ गुणांचा वेध घेतल्यामुळे भारताचे सुवर्णपदक निश्चित झाले. त्याआधी त्रिशा देब, पूर्वशा शेंडे आणि ज्योती सुरेखा वेन्नाम यांनी इराणवर २२४-२१७ अशी मात करत भारताला सांघिक कांस्यपदक मिळवून दिले होते.
महिलांच्या एकेरी कम्पाउंड प्रकारात त्रिशाने तैवानच्या हुआंग जोऊ हिचा १३८-१३४ असा पराभव करून कांस्यपदक पटकावले. शेवटच्या प्रयत्नापर्यंत पिछाडीवर असलेल्या त्रिशाने शेवटच्या प्रयत्नात सुरेख कामगिरी करून कांस्यपदक पटकावले. चौथ्या फेरीत सुरेख कामगिरी करणारी जोऊ पाचव्या आणि अंतिम फेरीत मात्र चाचपडताना दिसली. तिला १८ गुण मिळवता आले. मात्र त्रिशाने या फेरीत २५ गुण मिळवत बाजी मारली.
अभिषेकने अंतिम फेरीत इराणच्या इबादी इस्माइली याला कडवी लढत दिली. पण अखेर अभिषेकला १४१-१४५ अशा चार गुणांच्या फरकाने पराभूत व्हावे लागले. पहिल्या नऊ प्रयत्नांत अभिषेकने आघाडी मिळवली होती. पण त्यानंतर इबादीने अभिषेकला मागे टाकत सुवर्णपदक प्राप्त केले.