गोल्फला आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलणारे अमेरिकेचे महान खेळाडू अरनॉल्ड पाल्मर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले, ते ८७ वर्षांचे होते.

गोल्फसम्राट म्हणून लोकप्रियता लाभलेल्या पाल्मर यांनी १९५८, १९६०, १९६२ व १९६४ मध्ये मास्टर्स स्पर्धेत विजेतेपद पटकावले. ब्रिटिश खुली स्पर्धा त्यांनी १९६१ व १९६२ मध्ये जिंकली. अमेरिकन ओपन गोल्फ स्पर्धेत त्यांनी १९६० मध्ये अजिंक्यपद मिळविले होते. गोल्फमधील त्यांची नजाकत एवढी सुंदर होती की दूरचित्रवाणीवर अनेक वेळा त्यांच्या खेळाचे प्रक्षेपण केले जात असे.

पाल्मर यांनी १९५४ मध्ये वयाच्या २४ व्या वर्षी अमेरिकन हौशी स्पर्धेचे विजेतेपद मिळविले होते. त्यानंतर त्यांनी व्यावसायिक स्पर्धामध्ये भाग घेण्यास सुरुवात केली. त्यांनी व्यावसायिक स्पर्धामध्ये ६२ वेळा अजिंक्यपद पटकाविले.

एका मोसमात एक लाख डॉलर्सपेक्षा जास्त कमाई करणारे ते पहिले खेळाडू होते. त्यांनी सांघिक स्पर्धेत सहा वेळा रायडर चषक स्पर्धेत भाग घेतला. १९७४ मध्ये त्यांची गोल्फच्या हॉल ऑफ फेममध्ये निवड झाली. त्यांना अमेरिकेतील अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळाले.

क्रीडा क्षेत्रातील राजदूत म्हणून अनेक जाहिराती मिळविणारे ते पहिले अमेरिकन क्रीडापटू होते. त्यांनी २००४ मध्ये सलग ५० मास्टर्स स्पर्धामध्ये भाग घेतला होता.

राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी सांगितले की, ‘गोल्फ क्षेत्राचा राजदूत आम्ही गमावला आहे. केव्हाही व कोणत्याही खेळाडूला मार्गदर्शन करण्यासाठी ते धडपडत असत.  त्यांनी भरपूर पारितोषिके मिळविली होती, मात्र सतत समाजोपयोगी कार्यात त्यांचा हातभार असे.’

माजी अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांनी सांगितले की, ‘सहसा गोल्फ हा खेळ मी फारसा मनापासून पाहत नसे, मात्र पाल्मर यांच्या आकर्षक शैलीमुळेच मी गोल्फकडे आकर्षित झालो.’

‘गोल्फ हा कंटाळवाणा खेळ समजला जात असला तरी पाल्मर यांनी स्वत:च्या अनोख्या शैलीने हा खेळ आकर्षक केला होता, असे गोल्फपटू जेसन डे याने म्हटले आहे.

पाल्मर हे माझ्यासाठी आदर्श खेळाडू व मार्गदर्शक होते. कधीही मला या खेळाबाबत मार्गदर्शन हवे असेल त्या वेळी मी त्यांच्याकडे संपर्क साधून माझ्या शंकांचे निरसन करून घेत असे. त्यांच्याखेरीज गोल्फ क्षेत्र अपूर्णच राहील.

– टायगर वूड्स , आंतरराष्ट्रीय गोल्फपटू