गुडघ्याला झालेल्या दुखापतीतून सावरून पुनरागमन करणे हे कधीच सोपे नसते. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी मेहनतीने राष्ट्रीय संघात परतला आहे. आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषकात त्याच्याकडून मोठय़ा अपेक्षा आहेत, असे मत भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने व्यक्त केले आहे.

गेल्या वर्षी शमीच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर दुखापतीतून सावरण्यासाठी बराच वेळ लागल्याने त्याचे संघात परतणे लांबले होते. ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघात त्याचे स्थान होते. परंतु दुखापत बरी न झाल्यामुळे त्याला माघार घ्यावी लागली होती.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या भारताच्या पहिल्या सराव सामन्यात तो प्रथमच पुनरागमनानंतर खेळला. यात त्याने ३० धावांत २ बळी घेतले. याविषयी रोहित म्हणाला, ‘‘गुडघ्याच्या दुखापतीनंतर पुनरागमन करणे हे वेगवान गोलंदाजासाठी मुळीच सोपे नसते. विंडीजविरुद्धच्या सराव सामन्यात त्याने टिच्चून गोलंदाजी केली. बाऊन्सर्स, यॉर्कर्स आणि धिम्या चेंडूंचा त्याने प्रभावी वापर केला. तो संघातील महत्त्वाचा गोलंदाज आहे.’’