भारतीय क्रिकेटच्या मैदानात प्रशिक्षक आणि कर्णधार यांच्यातील वादाचे उदाहरण ताजे असताना अशा घटनांना बॅडमिंटनचा कोर्ट अपवाद नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. बॅडमिंटनच्या दुहेरी प्रकारात भारतातकडून प्रतिनिधित्व केलेल्या ज्वाला गुट्टाने प्रशिक्षक गोपीचंद यांनी खेळ सुधारण्यासाठी मला कधीही प्रोत्साहन दिले नाही, असे म्हटले आहे. यावेळी तिने गोपीचंद यांनी वेळोवेळी मला कमी दाखवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही केला. गोपीचंद यांच्यावर आरोप करताना तिने कारकिर्दीतील सर्वोच्च खेळीचा दाखला दिला. ज्वाला म्हणाली की, मी स्वत:ला एक खेळाडू मानते. त्यामुळे कोणाच्या मार्गदर्शनाखाली खेळते याचा मी फारसा विचार केला नाही. मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी पार पाडत असताना गोपीचंद यांनी प्रोत्साहित करणे तसेच माझ्या खेळाचे कौतुक करणे गरजेचे होते. कारण त्यावेळी मी अव्वलस्थानी होते. गोपीचंद या स्तरावर खेळले आहेत, त्यामुळे त्यांच्याकडून अशी अपेक्षा होती. पण त्यांनी माझ्याबाबतीत तेसे केले नाही. त्यांनी नेहमीच मला कमी लेखले.

पहिल्या दिवसापासूनच गोपीचंद यांनी मला लक्ष्य केले. २००६ मध्ये कॉमनवेल्थ स्पर्धेत विजय मिळवून परतल्यानंतर त्यांनी मला संघात स्थान दिले नाही. ही दुहेरीतील सर्वोच्च कामगिरी होती. आम्ही जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर असलेल्या जोडीला पराभूत केल्याचा उल्लेख देखील तिने यावेळी केला.  ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये बॅडमिंटन खेळाविषयीच्या भारतीय मानसिकतेवरही तिने प्रश्नचिन्ह उपस्थित केले. भारतामध्ये एकेरीला जितके महत्त्व दिले जाते, तितके महत्त्व दुहेरी प्रकाराला मिळत नाही. चीन आणि कोरियाच्या खेळाडूंना एकेरी किंवा दुहेरी खेळावे, याचा विचार करावा लागत नाही. तिकडे दोन्ही प्रकाराला महत्त्व दिले जाते. समतुल्य प्रशिक्षण दिले जाते. याउलट आपल्याकडे दुहेरीपेक्षा एकेरी खेळणारे खेळाडू अधिक प्रभावी ठरतात. ही परिस्थिती बदलण्याची गरज असल्याचे ती म्हणाली.