विजय कुमारला विश्वास
कुस्ती या खेळाला २०२०च्या ऑलिम्पिकपासून स्पर्धात्मक क्रीडा प्रकारातून वगळण्यात येणार आहे. ही बंदीची कुऱ्हाड रोखण्यासाठी केंद्र सरकार चांगला प्रयत्न करू शकेल, असे ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता नेमबाज विजय कुमार याने नवी दिल्लीत सांगितले.
लागोपाठ दोन ऑलिम्पिकमध्ये पदक मिळविण्याची किमया भारताच्या सुशील कुमार याने केली आहे. लंडन ऑलिम्पिकमध्ये योगेश्वर दत्तने कुस्तीत कांस्यपदक मिळविले आहे. ‘‘कुस्तीपटू मनापासून कौशल्य दाखवीत आहेत. कुस्तीवर बंदी घातली तर या गुणवान खेळाडूंवर अन्याय होणार आहे. कुस्ती हा पारंपरिक खेळ आहे. केवळ भारत नव्हे तर अनेक देशांमध्ये या खेळाला अफाट लोकप्रियता मिळते. असे असूनही त्यावर बंदी घालणे चुकीचे आहे,’’ असे विजय कुमारने सांगितले.
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या कार्यकारिणीची बैठक या महिन्यात होत आहे २०२०च्या ऑलिम्पिकमध्ये कोणत्या २५ खेळांचा समावेश करावयाचा, याचा निर्णय या बैठकीत केला जाणार आहे.
नेमबाजी स्पर्धाबाबत विजय कुमार म्हणाला, ‘‘आगामी राष्ट्रकुल व आशियाई क्रीडा स्पर्धापूर्वी चार जागतिक अजिंक्यपद स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेत चांगली कामगिरी करण्याचा माझा इरादा आहे.’’ विजय कुमारची पहिल्या दोन जागतिक स्पर्धाकरिता भारतीय संघात निवड झाली आहे.
‘‘नेमबाजीत दहा वर्षांपूर्वी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धामध्ये जेमतेम सहाशे स्पर्धक भाग घेत असत. आता सहा हजारांपेक्षा जास्त स्पर्धकांचा समावेश असतो, यावरूनच या खेळाची लोकप्रियता किती वाढली आहे, हे लक्षात येते,’’ असेही विजयने सांगितले.
दरम्यान, केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीला कुस्तीचे ऑलिम्पिकमधील स्थान कायम ठेवावे, अशी विनंती करणारे पत्र अलीकडेच पाठविले आहे.