दोनशेहून अधिक सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केलेल्या हॉकीपटू गुरबाज सिंगवर गटबाजी करणे आणि संघात मतभेद निर्माण करण्याच्या कारणांसाठी नऊ महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहे. हॉकी इंडियाच्या शिस्तपालन समितीने हा निर्णय सुनावला असून त्यामुळे या अनुभवी मध्यरक्षकाचे रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न धोक्यात आले आहे.
हरबिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी शिस्तपालन समितीची बैठक घेण्यात आली. या समितीत मध्यरक्षक आणि भारताचे माजी प्रशिक्षक ज्युड फेलिक्स यांचाही समावेश होता. गत महिन्यात बेल्जियम येथे झालेल्या जागतिक हॉकी लीग उपांत्य फेरी स्पध्रेत ज्युड यांनी अहवाल तयार करून गुरबाजवर आरोप केले होते. हरबिंदरसह माजी खेळाडू आर. पी. सिंग, ए. बी. सुब्बाइह आणि जस्जीत हंडा यांचाही समितीत सहभाग होता. या बंदी विरोधात दाद मागण्याचा अधिकार गुरबाजला असून एका महिन्याच्या कालावधीत तो हॉकी इंडियाच्या लवादाकडे दाद मागू शकतो.
‘‘गुरबाजला धडा शिकवण्याची हीच योग्य वेळ आहे. सततच्या गैरवर्तुवणुकीमुळे भारतीय हॉकीतील खोडकर मुलगा अशी त्याची ओळख झाली आहे,’’ असे मत हरबिंदर यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, ‘‘आजपासून पुढे नऊ महिन्यांसाठी गुरबाजला निलंबित करत आहोत. याचा अर्थ ९ मे २०१६पर्यंत तो भारताचे प्रतिनिधित्व करू शकत नाही. ज्युड फेलिक्स यांनी गुरबाज प्रकरणासंदर्भातील अहवाल शिस्तपालन समितीसमोर ठेवल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. ज्युड आणि गुरबाजही या बैठकीला उपस्थित होते आणि गुरबाजला त्याची बाजू मांडण्याची संधी आम्ही दिली होती.’’
फेलिक्स यांच्या अहवालात गुरबाज प्रशिक्षकांना सहकार्य करत नसल्याचा ठपकाही ठेवण्यात आला आणि त्याची ही वागणूक राष्ट्रीय संघाच्या प्रतिमेला तडा देणारी आहे. गुरबाज याआधीही चुकीच्या कारणास्तव चर्चेत आला होता. माजी प्रशिक्षक मायकेल नॉब्स आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांसोबत अशाच प्रकारची गैरवर्तवणूक केल्यामुळे गुरबाजला लंडन ऑलिम्पिकनंतर काही कालावधीसाठी निलंबित करण्यात आले होते. हरबिंदर यांनी गुरबाज हा भारताचा महत्त्वाचा खेळाडू असल्याचे मान्य केले, परंतु शिस्तीबाबत कोणतीही तडजोड करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘‘गुरबाज चांगला खेळाडू आहे, परंतु शिस्त महत्त्वाची आहे. लंडन ऑलिम्पिकनंतर त्याच्यावर अशा प्रकारचे आरोप करण्यात आले होते. त्यावेळी वागणुकीत सुधारणा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर त्याला माफ करण्यात आले, असे हरबिंदर सिंग यांनी सांगितले.

हे निलंबन मे २०१६ अखेपर्यंत आहे आणि त्याने या निर्णयाला आवाहन दिल्यास त्याच्यावरील बंदी उठू शकते व तो त्वरित संघात खेळू शकतो. तो गुणवान खेळाडू आहे आणि त्याचे ऑलिम्पिकचे स्वप्न भंगले असे मला वाटत नाही.
– हरबिंदर सिंग, शिस्तपालन समितीचे प्रमुख

ही कठोर शिक्षा – गुरबाज
’‘‘निलंबनाची कारवाई कठोर आहे. मात्र, त्याचा अधिक विचार न करता खेळावर लक्ष केंद्रित करणार आहे. कुटुंब, सहकारी खेळाडूंशी चर्चा केल्यानंतरच या निलंबनाविरोधात अपील करायचे की नाही याचा निर्णय घेणार आहे,’’ असे गुरबाजने स्पष्ट केले.
’तो म्हणाला, ‘‘माझ्याविरोधात अशा प्रकारचा अहवाल का देण्यात आला, याची कल्पना नाही. मी काहीच चुकीचे वागलेलो नाही. आजच्या बैठकीत माझी बाजू मांडली, परंतु ही शिक्षा थोडी कठोर आहे. त्याविरोधात दाद मागण्यासाठी ३० दिवसांचा कालावधी आहे आणि संबंधित व्यक्तींशी चर्चा केल्यानंतर मी दाद मागणार आहे’.