सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलेले डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा गुरमीत राम रहीम यांनी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीसंदर्भात एक आश्चर्यजनक खुलासा केला आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी ‘स्पॉटबॉय’ या वेब पोर्टलला मुलाखत दिली होती. त्यावेळी बाबा गुरमीत राम रहीम यांनी आपण विराट कोहलीला गुरूमंत्र दिल्याचा दावा केला. या मंत्रामुळेच विराट कोहलीची फलंदाजी बहरल्याचे त्यांनी सांगितले.

गुरमित राम रहिम यांचा २५ ऑगस्टला फैसला, पंचकुलामध्ये तणाव

विराट कोहली याने २००८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. मात्र, त्या वर्षी विराटला फक्त ५ एकदिवसीय सामन्यांमध्येच खेळण्याची संधी मिळाली. या सामन्यांमध्येही विराटला स्वत:ची विशेष छाप पाडता आली नव्हती. त्यानंतर २००९ हे वर्षही विराटसाठी निराशाजनक ठरले. त्याला एकूण १० एकदिवसीय सामन्यांमध्ये संधी मिळाली. मात्र, त्याला एकही शतक झळकावता आले नव्हते. याच दरम्यान विराट बाबा राम रहीम यांच्या सिसरा येथील आश्रमात गेला होता. तेव्हा विराटने बाबा राम रहीम यांची भेट घेतली आणि आपल्या बाहुंमध्ये बळ निर्माण करण्यासाठी काय करता येईल, असे त्यांना विचारले होते. तेव्हा बाबा राम रहीम यांनी विराटला आक्रमकपणे खेळ, असा गुरूमंत्र दिला. त्यानंतर २०१० मध्ये विराट कोहलीने एकूण २५ एकदिवसीय सामने खेळले. या सामन्यांमध्ये त्याने ७ अर्धशतकं आणि ३ शतके झळकावली. तेव्हापासून विराट कोहलीची फलंदाजी सातत्याने बहरत आहे. विशेष म्हणजे बाबा राम रहीम यांनी त्यावेळी विराटला फक्त खेळाच्याबाबतीतच नव्हे तर स्वत:च्या रागांवर नियंत्रण ठेवण्याचाही सल्ला दिला होता. मात्र, विराटने याबद्दल कधीच जाहीर वाच्यता का केली नाही, असा सवालही बाबा राम रहीम यांना विचारण्यात आला. तेव्हा कुणी मला श्रेय द्यावे, अशी माझी अपेक्षा नसल्याचे त्यांनी म्हटले. परंतु, माझ्या आश्रमात आलेल्या खेळाडूंनी देशाचे नाव उज्ज्वल केले, याचा आपल्याला अभिमान असल्याचे त्यांनी म्हटले. केवळ विराट कोहलीच नव्हे तर शिखर धवन, आशिष नेहरा, झहीर खान आणि युसूफ पठाण हे भारतीय संघातील खेळाडूही आपल्याकडे सल्ला मागण्यासाठी आले होते, असा दावाही बाबा राम रहीम यांनी केला होता.