‘दू सरा’ हे हरभजन सिंगच्या भात्यामधील सर्वात प्रभावी अस्त्र. १४ वष्रे भारतीय क्रिकेटची इमाने-इतबारे सेवा करणारा ‘सन ऑफ सरदार’ कारकिर्दीतील १००व्या कसोटीत खेळत आहे. पण तरीही ‘दुसरे’पणाचे दु:ख हे कायम त्याच्या वाटय़ाला आले. कधी फॉर्म, कधी दुखापत, कधी नशीब तर कधी मैदानावरील आणि मैदानाबाहेरील लफडय़ांमुळे त्याच्या कारकिर्दीचे नुकसान झाले. अन्यथा त्याच्या खात्यावरील सामन्यांचा आणि बळींचा आलेख आणखी उंचावला असता. उत्साह, ईर्षां याचप्रमाणे देशावरील निस्सीम प्रेम हे हरभजनच्या अस्तित्वातूनच सहजपणे प्रकट होते. ‘भज्जी’ या टोपणनावाने जसा तो ओळखला जातो, तसाच प्रतिस्पर्धी संघाचा डाव उलथून टाकण्याची किमया साधणारा हा पंजाब दा पुत्तर ‘टर्बनेटर’ म्हणूनही प्रचलित आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत वानखेडे स्टेडियमवरील कसोटीत तिसरा फिरकी गोलंदाज म्हणून त्याला संधी मिळाली, तर चेन्नईच्या चेपॉकवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध आर. अश्विनच्या साथीने दुसरा फिरकी गोलंदाज म्हणून त्याला संघात स्थान देण्यात आले आहे. पण आता हरभजन बळींसाठी झगडताना आढळतो. सध्या भारतीय संघातील सर्वात अनुभवी गोलंदाज असूनही, त्याच्या गोलंदाजीतील बोथट झालेली धार आता त्याच्या कारकिर्दीचा अस्त जवळ आला आहे, हे सत्य सहजपणे सांगून जाते.
हरभजनचा जन्म एका मध्यमवर्गीय शीख कुटुंबातला. पाच बहिणींसमवेत हा लहानाचा मोठा झाला. वडिलांचा बॉलबेअरिंग आणि व्हॉल्वचा व्यवसाय. पण तरीही आपल्या मुलाने क्रिकेटपटू होऊन भारताचे प्रतिनिधित्व करावे, हे स्वप्न त्यांनी जोपासले होते. वडिलांच्या स्वप्नातूनच मुलाच्या कारकिर्दीचा आलेख उंचावत गेला, पण भारतीय क्रिकेटमध्ये लेग-स्पिनर अनिल कुंबळे स्थान टिकवून होता. त्याव्यतिरिक्त सुनील जोशी, मुरली कार्तिक, शरणदीप सिंग असे अनेक फिरकी गोलंदाज खेळत होते. ऑस्ट्रेलियाविरुद्धच हरभजनने जेमतेम पदार्पण केले, पण भज्जी सर्वात प्रथम तळपला तो २००१मध्ये. कुंबळेला दुखापत झाल्यामुळे भारतीय संघ व्यवस्थापन चिंतेत होते, पण कणखर सौरव गांगुली मात्र निर्धास्त होता. ऑस्ट्रेलियाचा संघ सलग १५ विजयांनिशी आपला अश्वमेध घेऊन भारतात विजयी आविर्भावात आला होता. १९६९नंतर भारतीय भूमीवर पुन्हा विजयी पताका फडकावण्याचा त्यांचा निर्धार होता. पण गांगुलीने जगासमोर स्पष्टच करून टाकले की, आमच्या फिरकीची मदार हरभजनवर असेल. मग ऑस्ट्रेलियाने मुंबईचा बालेकिल्ला सर करून दाखविला, पण गांगुली खचला मुळीच नव्हता. मग कोलकाता आणि चेन्नईचे गड जिंकत भारताने मालिकेवर २-१ असे प्रभुत्व मिळवले. त्या मालिकेत ऑसी फलंदाजांनी हरभजनचा विलक्षण धसका घेतला होता. त्याने १७.०३च्या सरासरीने एकूण ३२ बळी घेत मालिकावीर पुरस्कारालाही गवसणी घातली.
कसोटी क्रिकेटच्या दुनियेत हरभजनला ओळख मिळवून देणारे हरभजनचे हेच पहिले यश. पण या आधीचा प्रवासही तितकासा सुखकर नव्हता. हरभजनची गोलंदाजीची शैली वादग्रस्त आहे, तो चेंडू फेकतो, असा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला. त्यामुळे सुरुवातीच्या काळात अनेक अग्निपरीक्षांना त्याला सामोरे जावे लागले. ऑस्ट्रेलिया-इंग्लंडच्या मंडळींनी तर भारत, श्रीलंका, पाकिस्तान यांसारख्या राष्ट्रांमधील फिरकी गोलंदाजांना संपविण्याचा विडाच उचलला होता. लंकेचा महान ऑफ-स्पिनर मुथय्या मुरलीधरनसुद्धा या सापळ्यात अडकला होता. मग हरभजन इंग्लंडला फ्रेड टिटमस यांच्याकडे शैलीतील सुधारणा करण्यासाठी जाऊन आला.
२०००मध्ये हरभजनच्या वडिलांचे निधन झाले. पाच बहिणींच्या कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावर आली. नेमका याच काळात तो भारतीय संघातील स्थान पक्के करण्यासाठी धडपडत होता. सुमारे वर्षभर संघाबाहेर राहिल्यामुळे हरभजनच्या नैराश्यात आणखीनच भर पडली. क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेऊन भज्जीने थेट अमेरिका गाठली आणि तिथे तो ट्रक चालवून उदरनिर्वाह करू लागला. पण काही महिन्यांनंतर त्याला आपली चूक उमगली. वडिलांच्या स्वप्नाने त्याला परावृत्त केले आणि तो पुन्हा भारतात परतला. हरभजनच्या आयुष्याची पाने उलटतानाही साधे-सरळ देवाने प्रसन्न झाल्याप्रमाणे यश त्याच्या कधीच वाटय़ाला आले नाही. झगडणे हा त्याच्या जीवनाचा स्थायीभाव राहिला. याचप्रमाणे अनेक वादविवादांचे तरंग येनकेनप्रकारेण त्याच्या आयुष्यात उमटत होते. त्यामुळे वैयक्तिक आणि सार्वजनिक आयुष्यात हरभजन कायम चर्चेत राहिला.
१९९८मध्ये हरभजनने आपल्या पदार्पणाच्या एकदिवसीय सामन्यातच पंगा घेतला तो ऑस्ट्रेलियाचा कप्तान रिकी पाँटिंगशी. त्यामुळे त्याच्यावर शिक्षेचा आसूडही ओढण्यात आला. मग २०००मध्ये बंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या नियमांचा भंग केल्यामुळे त्याला बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला. २००६मध्ये एका मद्याच्या जाहिरातीत पगडी नसलेला हरभजन सर्वासमोर आला आणि एका नव्या वादाला तोंड फुटले. मग जानेवारी २००८मध्ये ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर ‘मर्कटनाटय़’ रंगले. अ‍ॅन्ड्रय़ू सायमंड्सला ‘माकड’ संबोधल्यामुळे उद्भवलेला हा वाद बराच गाजला. पाँटिंग आणि मॅथ्यू हेडन यांनी हरभजनवरील पूर्ववैमनस्यामुळे हे प्रकरण आणखी तापवले. पण या सर्व कालखंडात सचिन तेंडुलकर मात्र हरभजनच्या पाठीशी राहिला. क्रिकेटचा सच्चा राजदूत असे बिरुद मिरविणाऱ्या सचिनची साक्ष त्यामुळे या प्रकरणात महत्त्वाची ठरली होती. पण तरीही वर्णद्वेषात्मक टिपण्णीचा ठपका ठेवून भज्जीला एका कसोटी सामन्याची बंदी आणि मानधनाच्या ५०टक्के दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. मग एप्रिल २००८मध्ये मोहालीत आयपीएल स्पध्रेतील किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना संपल्यानंतर हरभजनने चक्क एस. श्रीशांतच्या कानाखाली आवाज काढून नवा वाद ओढवून घेतला. याचप्रमाणे ऑक्टोबर २००८मध्ये एका मुलाखतीत भज्जीने चांगलीच गरळ ओकली होती. ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक अ‍ॅडम गिलख्रिस्ट हा काही संत नाही आणि मॅथ्यू हेडन खोटारडा आहे, ही भज्जीची विधाने चांगलीच गाजली. त्यानंतर २०१०च्या आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्स विजयी झाल्यानंतर या पठ्ठय़ाने चक्क संघाची मालकीण नीता अंबानीला मिठी मारून उचलले होते. तेव्हा साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या. याशिवाय अनेक अभिनेत्री आणि मॉडेल्ससोबत त्याचे नाव जोडले गेले आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हरभजनने पदार्पण केले तेव्हा त्याला भारतीय संघात आव्हान होते ते कुंबळेचे. आता ताज्या दमाचे आर. अश्विन आणि प्रग्यान ओझा संघात चांगलेच स्थिरावले आहेत. या परिस्थितीत हरभजनला पुन्हा आपली जादुई किमया दाखवावी लागणार आहे. दिलखुलास स्वभावाचा हरभजन थट्टा-मस्करीत कधीही मागे नसतो. सचिनशी असलेली त्याची मैत्री ही सर्वश्रुतच आहे. त्यामुळेच गतवर्षीच्या हंगामात सचिनने हरभजनकडे नेतृत्वाची धुरा सोपवली होती. भज्जीनेच मुंबई इंडियन्सला चॅम्पियन्स लीग जिंकून दिली होती. आगामी आयपीएलमध्ये मुंबईचे नेतृत्व भज्जीचा कडवा शत्रू पाँटिंगकडे देण्यात आले आहे. तूर्तास, ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेत हरभजनला दमदार कामगिरीसाठी शुभेच्छा देऊया!