मुंबईचा संघ रणजी क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल झाला असून विजेतेपदाची ‘चाळिशी’ करण्यासाठी उत्सुक आहे. आतापर्यंतचा मुंबईचा प्रवास काहीसा खडतर असला तरी यावेळी सातत्यपूर्ण दर्जेदार अष्टपैलू खेळ करून संघाच्या कामगिरीत मोलाचा वाटा उचलला आहे तो अभिषेक नायरने. यावेळी चांगला खेळ झाला असून दुखापतीविना संपूर्ण मोसम खेळल्याचा आनंद झाल्याचे यावेळी नायरने व्यक्त केले.
यावर्षीच्या चांगल्या कामगिरीमुळे मी आनंदी आहे. गेल्या वेळी अंगठय़ाला जबर दुखापत झाली होती, पण या वर्षी सारे काही आलबेल आहे. गेल्या वर्षी किती सामने खेळलो हे माहिती नाही, पण या वर्षी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न केला आणि यापुढेही करत राहीन, असे नायरने सांगितले.
सिंकदराबादमध्ये जन्मलेल्या अभिषेकने यंदाच्या मोसमात १० सामन्यांमध्ये १०४ च्या सरासरीने ९४० धावा केल्या आहेत. यामध्ये तीन शतकांबरोबर ८ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचबरोबर १६ डावांमध्ये सात वेळा नाबाद राहण्याची किमया त्याने साधली आहे. त्याचबरोबर यंदाच्या मोसमात त्याने १६ फलंदाजांना बाद केले असून ब्रेबॉर्न स्टेडियमवर १३ धावांत ६ बळी मिळवून त्याने बंगालच्या संघाचे कंबरडे मोडले होते, पण अन्य गोलंदाजांची साथ न लाभल्याने मुंबईला विजय मिळवता आला नसता. २००९ साली नायरचा भारतीय संघात समावेश करण्यात आला होता. पण त्यावेळी त्याला जास्त संधी देण्यात आली नव्हती. या कामगिरीच्या जोरावर भारतीय संघात स्थान मिळवशी का, असे विचारल्यावर अभिषेक म्हणाला की, हे सर्वस्वीपणे निवड समिती सदस्यांवर अवलंबून आहे. सध्या कामगिीरी चांगली होत असून संधी मिळाली तर त्याचे नक्कीच सोने करेन. भारतासाठी खेळणे हे माझे ध्येय आहे, पण सध्यातरी रणजी स्पर्धेचा अंतिम सामना काही दिवसांवर असून त्याचा विचार मी जास्त करत आहे. जर माझ्याकडून चांगली कामगिरी होत राहीली तर नक्कीच माझे ध्येय मी गाठू शकेन.