भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका सध्या रोमांचक वळणावर येऊन ठेपली आहे. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघांनी १-१ अशी बरोबरी साधली आहे. त्यामुळे धर्मशाला येथे होणारी अखेरची कसोटी निर्णायक ठरणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील कसोटी संघाला १६ वर्षांपूर्वी फिरकीपटू हरभजन सिंगच्या अफलातून प्रदर्शनातून प्रेरणा घेऊन नक्कीच धर्मशाला कसोटीत कांगारुंवर मात करता येईल. हरभजन सिंगने आपल्या फिरकीच्या जोरावर संघासाठी विजयश्री खेचून आणला होता. ठिक १६ वर्षांपूर्वी २००१ साली याच दिवशी चेन्नई कसोटीत हरभजन सिंग याने एकूण १५ विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता. चेन्नई कसोटीतील विजयासह भारतीय संघाने मालिकेत विजय साजरा केला होता. भज्जीने पहिल्या डावात ७ , तर दुसऱया डावात ऑस्ट्रेलियाच्या ८ खेळाडूंना गारद केले होते. भारतीय संघाने दोन विकेट्सने सामना जिंकून मालिका २-१ अशी जिंकली होती.

चेन्नई कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मॅथ्यू हेडनच्या द्विशतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात ३९१ धावा करता आल्या होत्या. हेडन व्यतिरिक्त इतर कोणताही फलंदाज मैदानात टिकू शकला नाही. भज्जीच्या फिरकीसमोर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी नांगी टाकली. प्रत्युत्तरात भारतीय संघाने ५०१ धावांपर्यंत मजल मारली. भारतीय संघाकडून सचिन तेंडुलकरने १२६ धावांची सर्वाधिक खेळी साकारली. तर राहुल द्रविडने ८१ धावांचे योगदान दिले होते. भारतीय संघाला पहिल्या डावात ११० धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतला आली. दुसऱया डावात हरभजनने ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात ओढून त्यांचा डाव २६४ धावांत संपुष्टात आणला होता. त्यामुळे भारतीय संघासमोर विजयासाठी फक्त १५५ धावांचे कमकुवत आव्हान होते. व्हीव्हीएस लक्ष्मणच्या ६६ धावांच्या सर्वाधिक खेळीच्या जोरावर भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचे आव्हान गाठले आणि विजय प्राप्त केला.