क्रिकेटर हरभजन सिंगने ट्वीट करून आरोप केलेल्या एका विमानपायलटवर आता कारवाई झाली आहे. चंदीगड ते दिल्ली या विमानप्रवासादरम्यान जेट एअरवेजच्या एका परदेशी पायलटने एका भारतीय प्रवाशा ‘ब्लडी इंडियन’ अशी शिवी देत एक महिलेला मारहाण केली असा आरोप हरभजनने केला होता. त्यानंतर आता जेट एअरवेज् ने या पायलटला आपल्या रोस्टरवरून काढून टाकलं आहे. पण हा प्रकार घडला तेव्हा या विमानामध्ये आपण  नव्हतो आणि आपल्या ओळखीच्या माणसाने हा प्रकार सांगितल्याचं हरभजनने जाहीर केलं.

जेट एअरवेजचा पायलट बर्न्ड होसलीन याने विमानात एका प्रवाशाला ‘ब्लडी इंडियन’ असे हिणवत विमानातून बाहेर जाण्यास सांगितले. याशिवाय पायलटने एका दिव्यांग प्रवाशासह एका महिला प्रवाशासोबतही गैरवर्तन केले, अशी माहिती हरभजनने ट्विटवर हॅण्डलवर दिली. हरभजनने घडलेल्या प्रकरावर तीव्र संताप व्यक्त केला.

काय आहे प्रकरण?

या विमानात प्रवास करत असलेल्या एका भारतीय प्रवाशाचा आणि पायलटचा वाद झाला. त्यानंतर पायलटने प्रवाशावर वर्णद्वेषी टिप्पणी केली. पायलटने केवळ वर्णद्वेषी टिप्पणीच नाही, तर एका महिला प्रवाशासोबत गैरवर्तन देखील केले. तसेच एका दिव्यांग प्रवाशाला धक्काबुक्की आणि शिवीगाळ देखील केली, असे हरभजनने म्हटले आहे.

भारतात काम करत असतानाही जेट एअरवेजच्या पायलटने भारतीय प्रवाशांसोबत असे वर्तन करणे भारतात खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा जेट एअरवेजला देत त्वरित कारवाईची मागणी केली. मारहाण करणारा पायलट हा परदेशी असून, जेट एअरवेजनेही या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित विभागाला चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच या प्रकाराबद्दल प्रवाशांकडे दिलगिरीही व्यक्त केली आहे.