भारतीय संघाला हार्दिक पांड्याच्या रुपात एक चांगला अष्टपैलू खेळाडू मिळालाय. त्याच्या सातत्यपूर्ण खेळीनंतर पांड्याची तुलना ही माजी कर्णधार आणि अष्टपैलू कपिल देव यांच्यासोबत केली जाते आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात आघाडीची फलंदाजी कोलमडल्यानंतर धोनीच्या साथीनं त्यानं भारताच्या डावाला आकार दिला. तर तिसऱ्या सामन्यात बढती मिळाल्यानंतर मालिकेतील दुसऱ्या अर्धशतकासह कामगिरीतील सातत्य दाखवून दिलं. दोन्ही सामन्यात त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. या मालिकेत तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यात ५ बळी मिळवत त्यानं गोलंदाजीतही आपली छाप पाडली आहे.

पांड्याच्या दमदार कामगिरीच सर्वत्र कौतुक होत असताना कपिल देव यांनी पांड्याला आणखी मेहनत घेण्याचा सल्ला दिलाय. पांड्या हा माझ्यापेक्षा उत्तम खेळाडू आहे. पण क्रिकेटच्या मैदानात यशातील सातत्य टिकवून ठेवण्यासाठी त्याला आणखी मेहनत घ्यावी लागेल, असे कपिल देव यांनी एका मुलाखतीमध्ये म्हटले. क्रिकेट चाहत्यांनी किंवा भारतीय संघ व्यवस्थापनाने पांड्यावर अपेक्षांचं ओझ टाकू नये, असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केलं.

कपिल म्हणाले, पांड्या हा माझ्यापेक्षा उत्कृष्ट खेळाडू आहे. पण त्याला आणखी मेहनत घेण्याची गरज आहे. त्याच्याकडे सर्वोत्तम खेळाडू होण्याची पूर्ण क्षमता आणि कौशल्य आहे. मात्र, त्याच्याकडून अधिक अपेक्षा ठेवल्यानं तो दबावात खेळणार नाही, याची आपल्याला काळजी घ्यावी लागेल. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत तो दमदार कामगिरी करताना दिसत आहे. या मालिकेतील तीन सामन्यात पांड्यानं १८१ धावा केल्या आहेत. यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे. मालिकेतील सर्वाधिक धावासोबतच सर्वाधिक स्टाईक रेटनं धावा करण्यातही पांड्या अव्वल आहे.