अटीतटीच्या लढतीत चीनच्या टॅन झोंगयीचा विजय

भारताची ग्रँडमास्टर द्रोणावली हरिकाला सलग तिसऱ्यांदा महिला जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पध्रेत कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. उपांत्य फेरीत मॅरेथॉन कोंडी फोडणाऱ्या (टायब्रेकर) लढतीत चीनच्या टॅन झोंगयीला ‘सरस वेळेच्या’ जोरावर विजयी घोषित करण्यात आले. या लढतीत हरिकाने अनेक संधी गमावल्या आणि त्यामुळे सामन्यातील रंजकता अधिक वाढली. अंतिम फेरीत टॅनसमोर युक्रेनच्या अ‍ॅना मुझीचुकचे आव्हान आहे.

निर्णायक लढतीत ९९चालींनंतर सरस वेळेनुसार टॅनला विजयी जाहीर करण्यात आले. उपांत्य फेरीच्या दोन क्लासिकल लढतीत दोन्ही खेळाडूंनी पांढऱ्या मोहऱ्याने खेळण्याचा फायदा उचलताना १-१ अशी बरोबरी साधली. त्यानंतर २५ मिनिटांचे दोन, १० मिनिटांचे दोन जलद आणि ५ मिनिटांच्या ब्लिट्झ सामन्यांतही निकाल बरोबरीत सुटल्यामुळे नाटय़मय स्थिती निर्माण झाली होती. ४-४ अशा बरोबरीनंतर निकालासाठी ‘अर्मागेड्डोन’ डाव खेळवण्यात आला.

या डावात हरिकाकडे पाच मिनिटे, तर टॅनकडे चार मिनिटे होती. ६१व्या चालीनंतर प्रत्येक चालीसाठी खेळाडूंना तीन सेकंदाचा वाढीव वेळ देण्यात आला. या डावात काळ्या मोहऱ्यानिशी खेळणाऱ्या टॅनकडे एका मिनिटाचा कमी कालावधी होता आणि तिला बरोबरीही पुरेशी होती, परंतु हरिकाला विजय मिळवणे अनिवार्य होते. हरिकाने डावावर मजबूत पकड घेतली होती, परंतु विजय मिळवण्यासाठी हा प्रयत्न पुरेसा नव्हता. टॅननेही कडवा संघर्ष केला आणि चौथ्या मानांकित हरिकाचे डावपेच अपयशी ठरवले. डावावर पकड असूनही वेळेचे गणित जुळवण्यात हरिकाला अपयश आले.

तत्पूर्वी, झालेल्या कोंडी फोडणाऱ्या डावात हरिकाने पहिला डाव १७ चालींमध्ये जिंकून १-० अशी आघाडी घेतली. त्यामुळे दुसऱ्या डावात तिला बरोबरीही पुरेशी होती, परंतु नशिबाचा कौल तिच्या बाजूने नव्हता. तिच्याकडून झालेल्या चुकांचा फायदा टॅनने उचलला आणि विजयासह १-१ अशी बरोबरी साधली.

त्यानंतर टॅनने पहिला विजय मिळवून आघाडी घेतली आणि या वेळी नशिबाने हरिकाला साथ देत पुढील डाव जिंकण्यात मदत केली. टॅनने ५-४ अशा फरकाने विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला.