बुद्धिबळ हा आपला प्राचीन खेळ असला तरीही भारतात या खेळाचे युग निर्माण केले विश्वनाथन आनंद यानेच. विविध स्वरूपाच्या विश्वविजेतेपदावर पाच वेळा मोहोर उमटवीत खऱ्या अर्थाने या खेळातही करिअर करता येते हे त्याने दाखवून दिले. त्याच्यापासून स्फूर्ती घेत एस.विजयालक्ष्मी, कोनेरू हम्पी, द्रोणावली हरिका आदी खेळाडूंनी महिलांच्या बुद्धिबळातही जागतिक स्तरावर आपला ठसा उमटविला आहे. मात्र त्यांना आणखी प्रोत्साहन व सहकार्य मिळाले तर निश्चितच विश्वविजेतेपदावर भारतीय महिलांकडून नाव कोरले जाईल.

आपल्या देशातील अनेक महिलांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळविला असला तरीही अजून चूल आणि मूल या दोन क्षेत्रांपुरतेच भारतीय महिलांनी लक्ष केंद्रित करावे असेही मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळेच आजही ऑलिम्पिकमध्ये पदके मिळवूनही भारतीय महिलांना क्रीडा क्षेत्रात अपेक्षेइतका सन्मान मिळत नाही. विविध राष्ट्रीय पुरस्कार, शिष्यवृत्ती, सुविधा व सवलती आदींबाबत त्यांची उपेक्षाच केली जाते. पुरुष व महिला यांना समान वागणूक दिली जावी अशा घोषणा केल्या जातात. मात्र प्रत्यक्षात अजूनही काही क्रीडा प्रकारांमध्ये पारितोषिक रकमांबाबत असमानताच दिसून येत असते.

बुद्धिबळामध्ये गेल्या २० वर्षांमध्ये भारतीय खेळाडूंनी लक्षणीय प्रगती केली आहे. प्रत्येक वयोगटात भारतीय खेळाडूंनी जागतिक स्तरावर पदकांची लयलूट केली आहे. मुलांप्रमाणेच मुलींनीही भरपूर पदके मिळविली आहेत. खाडिलकर भगिनी, भाग्यश्री ठिपसे, अनुपमा गोखले, मृणालिनी कुंटे, स्वाती घाटे यांच्याबरोबरच सौम्या स्वामिनाथन, ईशा करवडे, तानिया सचदेव, मेरी अ‍ॅन गोम्स, कृत्तिका नाडिग, आरती रामस्वामी, पद्मिनी राऊत, आकांक्षा हगवणे आदी अनेक खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळविले आहे. या सर्वच खेळाडूंना बुद्धिबळात अव्वल यश मिळविताना खूप संघर्ष करावा लागला आहे. भारतीय क्रीडा क्षेत्रात महिलांचा फारसा बोलबाला नसतानाही पालकांच्या भक्कम पाठिंब्याच्या जोरावर त्यांनी बुद्धिबळात करिअर विकसित केले आहे. असे असूनही महिला बुद्धिबळपटूंचा संघर्ष संपलेला नाही.

आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेषत: जागतिक स्पर्धेची पात्रता पूर्ण करायची असेल तर आंतरराष्ट्रीय मानांकन गुणांची आवश्यकता असते. हे मानांकन गुण मिळविण्यासाठी परदेशातील अधिकाधिक स्पर्धामध्ये भाग घेण्याची आवश्यकता असते. कारण आपल्या देशात अपेक्षेएवढय़ा आंतरराष्ट्रीय मानांकन गुणांच्या स्पर्धा होत नाहीत आणि समजा होत असतील तर त्यामध्ये अपेक्षेइतका परदेशी खेळाडूंचा सहभाग नसतो. परदेशातील स्पर्धामध्ये भाग घेताना बराचसा खर्चाचा भार स्वत:च या खेळाडूंना उचलावा लागतो. काही वेळा एका मोसमात अशा स्पर्धामध्ये भाग घेण्यासाठी या खेळाडूंना साधारणपणे तीन चार लाख खर्च करावा लागतो. अजूनही क्रिकेट, फुटबॉल, टेनिस आदी खेळांचे प्राबल्य असलेल्या भारतात बुद्धिबळासाठी प्रायोजक मिळविताना खेळाडूंचे पालक, प्रशिक्षक व संघटक यांना खूपच अडथळ्यांना सामोरे जावे लागते.

बुद्धिबळाच्या स्वतंत्र ऑलिम्पियाड स्पर्धा होत असल्या तरीही अजूनही ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धामध्ये बुद्धिबळास स्थान मिळालेले नाही. त्यामुळे सरकारदरबारी या खेळास दुय्यम स्थान आहे. द्रोणाचार्य, अर्जुन आदी राष्ट्रीय तर शिवछत्रपती, जिजामाता आदी राज्य स्तरावरील पुरस्कारांबाबत बुद्धिबळपटू उपेक्षितच असताता. १६ वर्षांखालील गटात आकांक्षा हगवणे या पुण्याच्या खेळाडूने जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले असले तरीही तिला जिल्हा स्तरावरील पुरस्कारांबाबत नियमात बसत नाही म्हणून डावलले जाते.

जागतिक स्तरावरील महिलांच्या विभागात रशिया, चीन, युक्रेन आदी देशांचे प्राबल्य असतानाही हंपी, हरिका आदी खेळाडूंनी जागतिक स्तरावर पहिल्या दहा क्रमांकांमध्ये झेप घेतली आहे. हे लक्षात घेऊन महिला बुद्धिबळपटूंची उपेक्षा संपविण्याची गरज आहे. संघटनात्मक स्तरावरील मतभेद दूर ठेवीत व शासनदरबारी आपले नाणे खणखणीत करीत बुद्धिबळ संघटकांनी खेळाडूंचा विकास हेच ध्येय केंद्रस्थानी ठेवले पाहिजे. असे झाल्यास हंपी, हरिका यांच्यासारख्या अनेक अव्वल दर्जाच्या खेळाडू भारतात घडतील.

मिलिंद ढमढेरे

milind.dhamdhere@expressindia.com