भारताच्या द्रोणावली हरिकाने जागतिक महिला बुद्धिबळ स्पर्धेतील अंतिम फेरीच्या आशा कायम राखल्या. तिने युक्रेनच्या मारिया मुझीचुक हिच्याविरुद्धचा दुसरा डावही बरोबरीत सोडवला़  त्यामुळे टायब्रेकरच्या निकालावर हरिकाचा निर्णय अवलंबून आहे.
हरिका व मारिया यांच्यातील पहिला डाव बरोबरीत राहिला होता. त्यामुळे त्यांच्यात टायब्रेकरचे डाव खेळवले जातील. दुसऱ्या डावात पांढऱ्या मोहरांच्या साहाय्याने खेळणाऱ्या हरिकाने मारियावर दडपण आणण्याचा प्रयत्न केला. डावातील मध्यास हरिकाच्या प्याद्याची स्थिती थोडीशी कमकुवत झाली. मात्र हरिकाने वेगवेगळय़ा व्यूहरचना करीत डावजिंकण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. त्यात यश न आल्याने अखेर ७८व्या चालीस दोन्ही खेळाडूंनी बरोबरीचा प्रस्ताव मान्य केला.
अन्य लढतीत स्थानिक खेळाडू नतालिजा पोगोनिना हिने स्वीडनच्या पिआ क्रॅमलिंगविरुद्ध ०-१ अशा पिछाडीवरून दुसरा डाव जिंकला आणि १-१ अशी बरोबरी केली. त्यांच्यातही २५ सेकंदांचे प्रत्येकी दोन जलद डाव खेळविले जाणार आहेत.  पोगोनिनाविरुद्ध पहिला डाव जिंकलेल्या क्रॅमलिंगची बाजू वरचढ होती, मात्र तिने दुसऱ्या डावात सिसिलीयन डिफेन्समधील जोखमीची व्यूहरचना करण्याचा प्रयत्न केला. मात्र हे डावपेच तिच्या अंगाशी आले. पोगोनिनाने राजाच्या बाजूने जोरदार आक्रमण केले. तिने वजीर व घोडय़ाच्या साहाय्याने क्रॅमलिंगचा बचाव उद्ध्वस्त केला व केवळ ३८ चालींमध्ये डाव जिंकला.