बहीण हेमजितकडून स्तुतिसुमने

‘‘तिने वीरेंद्र सेहवागप्रमाणे फलंदाजी केली आणि विराट कोहलीप्रमाणे आक्रमकता दाखवली,’’ अशा शब्दांत हरमनप्रीत कौरच्या वादळी फलंदाजीचे तिची बहीण हेमजितने वर्णन केले.

पंजाब राज्यातील मोगा भागात हरमनप्रीतचे निवासस्थान आहे. भारताल अंतिम फेरीत स्थान मिळवून देणाऱ्या या खेळीचा जल्लोष तिच्या घरीसुद्धा साजरा केला जात होता. नातलग, मित्रमंडळी यांच्याकडून रात्रीपासूनच अभिनंदनाचा अविरत वर्षांव सुरू आहे, असे कौर कुटुंबीयांनी सांगितले. कौर यांच्या घरी एखाद्या उत्सवाप्रमाणेच वातावर आहे. तरुण मंडळी ढोलकीच्या तालावर पंजाबी गाण्यांवर ठेका धरत आहेत, तर कुटुंबीय मिठाई वाटण्यात व्यग्र आहेत.

‘‘लहानपणीपासून हरमनप्रीत मुलांसोबत क्रिकेट खेळते. धावांची तिची भूक कधीच शमली नव्हती. हेच सारे तिच्या वेगवान खेळीतून दिसून आले,’’ असे हेमजितने सांगितले.

ती पुढे म्हणाली, ‘‘हरमनप्रीत अतिशय सकारात्मक वृत्तीची आहे. विराटप्रमाणे आक्रमकता जोपासते. मैदानाबाहेर मात्र शांत आणि संयमाने वागते. सुरुवातीपासूनच सेहवागच्या फलंदाजीला ती आदर्श मानते आणि त्याच्यासारखीच फलंदाजीही करते.’’