”इतक्या मोठ्या स्पर्धेत भारताचं प्रतिनिधीत्व करायला मिळणं ही काही साधी गोष्ट नाही. आजच्या सामन्यात माझ्या मुलीने जो काही खेळ केला आहे ते पाहून, ती हरली आहे असं मी कधीच म्हणणार नाही.” हे शब्द आहेत महिला विश्वचषकात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या हरमनप्रीत कौरचे वडिल हरमंधर सिंह यांचे.

लॉर्ड्सच्या मैदानावर अंतिम फेरीत झालेल्या सामन्यात इंग्लंडच्या संघाने भारतीय संघावर ९ धावांनी मात केली. वास्तविक पाहता सुरुवातीपासून या सामन्यावर भारताची पकड होती. पुनम राऊत आणि हरमनप्रीत कौरने भागीदारी करत भारताला विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवलेलं होतं. मात्र पुनम राऊत तंबूत परतली आणि भारतीय संघाची घसरगुंडीच उडाली. एकामागोमाग एक विकेट पडत राहिल्या आणि विश्वचषक भारताच्या हातून लांब लांब जात राहिला.

मात्र या गोष्टीचं हरमनप्रीतच्या वडिलांना फारसं दु:ख झालेलं नाहीये. या स्पर्धेत आपली मुलगी आणि महिला संघाने केलेल्या कामगिरीवर ते खूश आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य सामन्यात हरमनप्रीतने शतकी खेळी करत भारतीय संघाला अंतिम सामन्याचं तिकीट मिळवून दिलं होतं. त्यानंतर अंतिम सामन्यातही सलामीवीर पुनम राऊतला चांगली साध देत हरमनप्रीतने अर्धशतक झळकावलं होतं.

आपल्या या कामगिरीमुळे गेले काही दिवस हरमनप्रीत कौर अनेक भारतीयांच्या गळ्यातला ताईत बनलेली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धची तिची खेळी पाहून अनेकांनी महिला क्रिकेटला आता सुगीचे दिवस येतील अशी आशा व्यक्त केली होती. ज्या हालाखीच्या परिस्थितीतून मार्ग काढत हरमनप्रीतने भारतीय संघासाठी आपला सर्वोत्तम खेळ केलेला आहे. हार-जीत हा खेळाचा एक भागच आहे. त्यामुळे अंतिम सामन्यात झालेल्या पराभवामुळे हरमनप्रीत आणि महिला संघाच्या आतापर्यंतच्या मेहनतीला नजरेआड करुन चालता येणार नाही.