भारताचा ख्यातनाम कुस्तीपटू योगेश्वर दत्त नुकताच विवाहबद्ध झाला. योगेश्वरने आपल्या लग्नात हुंडा म्हणून फक्त एक रुपया स्विकारण्याचा निर्णय घेऊन सर्वांची वाहवा मिळवली. हुंड्याच्या प्रथेला फाटा देऊन योगेश्वरने समाजासमोर नवा पायंडा घातला. मग योगेश्वर दत्तच्या लग्न सोहळ्याला उपस्थित राहिलेल्या मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी योगेश्वरला लग्नाचा अनोखा आहेर दिला. खट्टर यांनी योगेश्वरच्या गावाच्या विकासकामासाठी १० कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली. योगेश्वरने आपल्या देशाचे नाव उंचावले आहे. त्यामुळे त्याच्या गावकऱयांच्या सर्व मागण्या पूर्ण व्हायला हव्यात, असे मुख्यमंत्री खट्टर यावेळी म्हणाले. यासोबतच गावात महाविद्यालय सुरू करण्याचेही आश्वासन यावेळी खट्टर यांनी दिले. योगेश्वरने आपल्या लग्नात केवळ १ रुपयाचा हुंडा घेणार असल्याचे जाहीर करताना म्हटले की, मी आमच्या कुटुंबातील मुलींच्या लग्नात हुंडा देताना होणारा त्रास बघितला आहे. मी दोन गोष्टींचा निर्धार केला होता. एक म्हणजे कुस्ती खेळण्याचा आणि दुसरा म्हणजे हुंडा न स्वीकारण्याचा. या दोन्ही गोष्टी आता पूर्ण झाल्या आहेत.

वाचा: हुंड्याविरोधात कुस्तीपटू योगेश्वरने थोपटले दंड, हुंड्यात घेतला फक्त १ रुपया

 

योगेश्वरच्या लग्नाबद्दल त्याची आई आनंदात आहे. योगेश्वरची आई सुशिला देवी यांनी मुलाच्या निर्णयाशी सहमती दर्शवली. आम्ही शूभ शकून म्हणून वधूच्या कुटुंबीयाकडून एक रुपया स्वीकारण्याचा निर्णय घेतला, असे त्यांनी सांगितले. या आनंदाच्या क्षणी मी वडील राममेहर दत्त आणि गुरु सतबिर सिंग हे दोघेही हवे होते असे त्याने म्हटले.

दरम्यान, योगेश्वरच्या भैंसवाल या गावात लग्नाचा मोठा उत्साह होता. योगेश्वरचा विवाह हरियाणा काँग्रेसचे नेते जयभगवान शर्मा याची एकुलती एक मुलगी शीतल हिच्याशी झाला आहे. योगेश्वरचे वस्ताद सतबीर यांनी हे लग्न जमवल्याचे सांगण्यात येते.