महाराष्ट्राच्या गोलंदाजांनी हरयाणाचा पहिला डाव ३३५ धावांवर रोखला आणि रणजी क्रिकेट सामन्यात मोठी धावसंख्या उभारण्याचे हरयाणाचे मनसुबे हाणून पाडले. उर्वरित खेळात महाराष्ट्राने पहिल्या डावात बिनबाद ७ धावा केल्या. पावसामुळे दोन सत्रांमध्ये खेळ होऊ शकला नाही.

गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात हरयाणाने ६ बाद ३०६ धावसंख्येवर पहिला डाव पुढे सुरू केला. हरयाणाने शेवटचे चार गडी अवघ्या २९ धावांमध्ये गमावले. शतकवीर हिमांशू राणा हा शेवटच्या फळीतील खेळाडूंच्या साहाय्याने मोठी धावसंख्या रचणार अशी अपेक्षा होती. तथापि चोरटी धाव काढण्याच्या प्रयत्नात राणा बाद झाला आणि हरयाणाचा डाव गडगडला. त्याला डॉमिनिक मुथ्थुस्वामीने धावबाद केले. राणाने ४१४ मिनिटांच्या खेळांत १५७ धावा केल्या. त्यामध्ये त्याने २१ चौकार मारले. त्याने जयंत यादवच्या साथीत ८७ धावांची भर घातली. यादव याने तीन चौकारांसह २९ धावा केल्या. पाठोपाठ त्याचे सहकारी हर्षल पटेल व आशीष हुडा हे भोपळा फोडण्यापूर्वीच तंबूत परतले.

महाराष्ट्राकडून समाद फल्लाह व निकित धुमाळ यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. महाराष्ट्राने तीन षटकांत बिनबाद सात धावा केल्या नाही तोच पावसाचा व्यत्यय सुरू झाला. त्यामुळे खेळ थांबविण्यात आला.

संक्षिप्त धावफलक

हरयाणा (पहिला डाव): १०६.१ षटकांत सर्वबाद ३३५ (वीरेंद्र सेहवाग ९२, हिमांशू राणा १५७, समाद फल्लाह ३/७८, निकित धुमाळ ३/५५)

वि. महाराष्ट्र (पहिला डाव) : ३ षटकांत बिनबाद ७.