क्रिकेटपटूंच्या स्टाईल स्टेटमेंटची चर्चा नेहमीच क्रिकेट विश्वात होत असते. क्रिकेटपटूंची हेयर स्टाईल अनेकदा चाहत्यांकडून फॉलो केली जाते. मात्र आयसीसी चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या सराव सामन्यात खेळाडूंची नव्हे, तर पंचांच्या नव्या लूकची जोरदार चर्चा होती. पंच अलीम दार यांचा नवा लूक पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. कायम क्लिन शेवमध्ये दिसणारे अलीम दार भारत विरुद्ध न्यूझीलँड सामन्यात वाढलेल्या दाढीत दिसले.

आपल्या नव्या लूकबद्दल अलीम दार यांनी पाकिस्तानच्या पीटीव्हीसोबत बातचीत केली. यावेळी बोलताना ‘दक्षिण आफ्रिकन फलंदाज हाशिम अमलाने मला इस्लामच्या नियमांनुसार दाढी ठेवण्यास सांगितले,’ असल्याचे दार यांनी म्हटले. ‘मला दाढी वाढवण्याची इच्छा होती. यादरम्यान मला अमलाने इस्लामच्या नियमानुसार दाढी वाढवण्याचा सल्ला दिला. यानंतर अमलाचा सल्ला अंमलात आणण्याचे ठरवले आणि दाढी वाढवली,’ अशी माहिती अलीम दार यांनी दिली.

दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज हाशिम अमला स्वत: मोठी दाढी ठेवतो. स्वभावातील नम्रपणा आणि सहजसुंदर फलंदाजीसाठी ओळखला जातो. मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये आक्रमक खेळण्याची आणि कसोटी सामन्यांमध्ये तासनतास फलंदाजी करण्याची क्षमता अमलामध्ये आहे. तर अलीम दार यांच्याकडे आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये प्रदीर्घ काळ पंच म्हणून काम करण्याचा अनुभव आहे. दार यांनी १११ कसोटी सामने, १८३ एकदिवसीय सामने आणि ४१ टी-२० सामन्यांमध्ये पंच म्हणून काम पाहिले आहे. यासोबतच २००९, २०१० ते २०११ अशी सलग तीन वर्षे दार सर्वोत्तम पंच राहिले आहेत.

दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू असलेल्या अमलाने आयपीएलच्या १० व्या पर्वात १० सामन्यांमध्ये ६० च्या सरासरीने ४२० धावा केल्या. आयपीएलमध्ये दोन शतके झळकावणारा अमला एकमेव फलंदाज आहे. यंदाच्या मोसमात अमलाने पंजाबविरुद्ध ६० चेंडूंमध्ये १०४ फटकावल्या होत्या. यासोबतच अमलाने मुंबईविरोधात ६० चेंडूंमध्ये १०४ धावांची नाबाद खेळी साकारली होती.