क्रिकेटसाठी अमेरिका ही नवीन बाजारपेठ खुली झाली असून भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने या गोष्टीचे स्वागतच केले आहे. क्रिकेटसाठी ही चांगली जागा आहे, त्याचबरोबर चांगल्या सुविधाही आहेत. अमेरिकेत अधिकाधिक क्रिकेट खेळवले गेले तर अधिक चांगल्या सुधारणा होतील आणि येथील चाहत्यांनाही क्रिकेटचा आनंद लुटता येईल, असे मत भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने व्यक्त केले.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये दोन ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका अमेरिकेत खेळवण्यात आली होती. यामध्ये भारताला ०-१असा पराभव स्वीकारावा लागला.

अमेरिकेत क्रिकेट खेळल्यानंतर कसे वाटले, या प्रश्नावर धोनी म्हणाला की, ‘ ही अशी जागा आहे की जिथे वारंवार खेळायला आवडेल. इथे पुन्हा येऊन चौरंगी एकदिवसीय मालिका किंवा ट्वेन्टी-२० मालिका खेळवली जाऊ शकते. या ठिकाणी ट्वेन्टी-२० मालिकेने चांगली सुरुवात झाली आहे. हे ठिकाण क्रिकेटसाठी नक्कीच चांगले आहे. सलग दोन दिवसांमध्ये दोन सामने खेळवले गेले असले तरी अमेरिकेत आम्हाला चाहत्यांशी चांगला संवाद साधता आला.’