फिफाच्या आचारसंहिता समितीची कारवाई; इसा हयाटोयू हंगामी अध्यक्ष

महाघोटाळ्यांनी ग्रासलेल्या फिफा या फुटबॉल नियंत्रित करणाऱ्या शिखर संस्थेला आणखी एक धक्का बसला. महाघोटाळ्याप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडलेले संघटनेचे अध्यक्ष सेप ब्लाटर आणि त्यांच्यानंतर अध्यक्षपदाची धुरा हाती घेण्यासाठी शर्यतीत असलेले मायकेल प्लॅटिनी यांच्यावर फिफाच्या आचारसंहिता विभागाने कारवाई करत या दोघांनाही तीन महिन्यांकरता निलंबित केले आहे. दरम्यान आफ्रिका क्षेत्राचे प्रतिनिधी असलेल्या इसा हयाटोयू यांची हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

दरम्यान या दोघांवरील ही बंदी हंगामी स्वरूपाची असली तरी या बंदीसह क्रीडा विश्वातील सगळ्यात शक्तिशाली संघटना असणाऱ्या फिफाचे अध्यक्षपद भूषवणाऱ्या ब्लाटर यांची सद्दी संपुष्टात येण्याची दाट शक्यता आहे. ब्लाटर यांची जागा घेण्यासाठी उत्सुक प्लॅटिनी यांच्यावरही बंदीची कुऱ्हाड कोसळल्याने अध्यक्षपदासाठीच्या शर्यतीतून त्यांचे नाव कायमचे बारगळण्याची चिन्हे आहेत.

या दोघांसह फिफाच्या स्वतंत्र आचारसंहिता समितीने दक्षिण कोरियाचे प्रभावशील संघटक आणि फिफाच्या अध्यक्षपदासाठी प्रयत्नशील च्युंग मूंग जून यांच्यावर सहा वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे. तिकिटांच्या गैरव्यवहारप्रकरणी संघटनेचे सरचिटणीस जेरोम व्हाल्के यांना याआधीच पद सोडण्याचे आदेश देण्यात आले होते. आता त्यांच्यावरही ९० दिवसांकरता बंदी घालण्यात आली आहे.

फुटबॉल विश्वातील या बलशाली संघटकांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील कामकाजात भाग घेता येणार नाही. बंदीचा कालावधी तात्काळ सुरू झाल्याचे फिफाने जाहीर केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

६९वर्षीय हयाटोयू दक्षिण आफ्रिका महासंघाचे अध्यक्ष असून, संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष या पदावर कार्यरत होते. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने हयाटोयू यांना गैरवर्तनाबद्दल ताकीद दिली होती.

विश्वचषक आयोजनाचे अधिकार, तिकिटांचा काळाबाजार, विपणन करार अशा विविध आरोपांखाली स्वित्र्झलड पोलिसांनी फिफाच्या चौदा पदाधिकाऱ्यांना अटक केली होती. अमेरिकेच्या अ‍ॅटर्नी जनरलच्या यांच्या पुढाकाराने झालेल्या या कारवाईने फुटबॉल विश्वाला हादरा बसला होता. २०११ मध्ये २ दशलक्ष डॉलर्स रकमेचा बेकायदेशीरपणे स्वीकार केल्याच्या प्रकरणात प्लॅटिनी यांचे नाव होते. प्लॅटिनी यांनी मात्र या आरोपांचा इन्कार केला होता. बंदीचा कालावधी जानेवारी महिन्यात संपत असून, हा कालावधी आणखी ४५ दिवसांसाठी वाढवण्यात येऊ शकतो. कारण २६ फेब्रुवारी रोजी फिफाच्या निवडणुका होणार आहेत.