इंग्लंडमधील मैदानावर त्यांना हरविणे ही काही सोपी गोष्ट नाही. मात्र भारतीय गोलंदाजांनी अष्टपैलू कामगिरी करीत संघास हा ऐतिहासिक विजय मिळवून दिला. या गोलंदाजांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे, असे ज्येष्ठ क्रिकेटपटू चंदू बोर्डे यांनी सांगितले.
‘‘भारतीय संघातील इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी या द्रुतगती गोलंदाजांनी अतिशय प्रभावी कामगिरी केली आहे. पहिल्या डावात कुमारने सहा बळी घेतले होते, तर दुसऱ्या डावात शर्माने सात बळी घेत इंग्लंडच्या फलंदाजीचा कणा मोडला, त्यामुळेच भारतास अव्वल कामगिरी करता आली. आतापर्यंत या दौऱ्यात भारताच्या शेवटच्या फळीतील खेळाडूंनीही भारतास फलंदाजीत भरघोस धावा मिळवून दिल्या आहेत. संघातील प्रत्येक खेळाडूने कौतुकास्पद कामगिरी केली आहे. महेंद्रसिंह धोनी याच्या कुशल नेतृत्वाचाही संघाच्या यशात सिंहाचा वाटा आहे,’’ असे बोर्डे म्हणाले,
 बोर्डे यांनी सोमवारी ८१व्या वर्षांत पदार्पण केले. त्यानिमित्त बोर्डे यांना अनेक चाहत्यांनी घरी जाऊन शुभेच्छा दिल्या. त्याबद्दल बोर्डे म्हणाले, ‘‘मला प्रसारमाध्यमे व चाहत्यांनी भरभरून प्रेम दिले आहे. त्यांचा मी अतिशय ऋणी आहे. आतापर्यंत मी सरळ बॅटीनेच जीवन जगलो आहे. त्यामुळे मी अजूनही मैदानावर कार्यरत असतो. माझ्या या समर्थ वाटचालीचे श्रेय माझ्या कुटुंबीयांना द्यावे लागेल. त्यांच्या सहकार्यामुळेच मी पूर्णपणे क्रिकेट कारकीर्दीवर लक्ष केंद्रित करू शकलो.’’