इंग्लंडचा ऐतिहासिक विजय

* इंग्लंडने मालिका २-१ अशी जिंकली * तब्बल २८ वर्षांनंतर साकारला भारतात मालिका विजय * चौथा

मनोज जोशी, नागपूर | December 18, 2012 5:45 AM

* इंग्लंडने मालिका २-१ अशी जिंकली
* तब्बल २८ वर्षांनंतर साकारला भारतात मालिका विजय
* चौथा कसोटी सामना अनिर्णित
* जेम्स अ‍ॅन्डरसन सामनावीर, अ‍ॅलिस्टर कुक मालिकावीर
‘आपल्या देशात आपणच राजे’ या आविर्भावात भारतीय संघ इंग्लंड येण्यापूर्वी वावरत होता, पहिला सामना जिंकलाही, पण दुसऱ्या सामन्यापासून मात्र भारतीय संघाची आपल्याच मैदानात ससेहोलपट सुरू झाली. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही प्रकारांत भारतीय संघ कुचकामी ठरला, तर दुसरीकडे वातावरण, खेळपट्टय़ा मिळत्या-जुळत्या नसूनही जिद्द, चिकाटी आणि अथक मेहनतीच्या जोरावर इंग्लंडचा संघ भारतीय संघावर शिरजोर झाला. तीन सामन्यांनंतर मालिकेत आघाडी घेतल्यावर जामठय़ाच्या संथ खेळपट्टीवर इंग्लंडने यशस्वीरीत्या सामना अनिर्णित राखला आणि मालिका २-१ अशी जिंकत भारताचे त्यांच्याच घरात वाभाडे काढले. इंग्लंडचे फलंदाज लवकरात लवकर बाद करून दुसऱ्या डावात त्यांच्यावर मात करण्याची भारतीय संघ स्वप्न पाहत होता खरा, पण जोनाथन ट्रॉट आणि इयान बेल या जोडीने सामन्याच्या अखेरच्या दिवशी द्विशतकी भागीदारी रचली आणि भारताचे स्वप्न धुळीस मिळवले. मालिका जिंकत इंग्लंडने २८ वषार्ंनंतर भारताची त्यांच्याच मातीत धूळधाण उडवली आणि ऐतिहासिक विजय संपादन केला. तर दुसरीकडे कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि भारतीय संघाच्या वाटय़ाला काही काळापासून येणारी अपयशाची मालिकाही कायम राहिली आहे. या वेळी सामनावीराचा पुरस्कार ८१ धावांत ४ बळी घेणाऱ्या इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अ‍ॅन्डरसनला देण्यात आला, तर धावांची टाकसाळ उघडून भारतीय संघाला गोलंदाजी विसरायला लावणाऱ्या आणि तीन शतके झळकावून एकूण ५२६ धावा काढणाऱ्या अ‍ॅलिस्टर कुकला मालिकावीराचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यापूर्वी १९८४-८५ साली भारतीय संघाविरुद्ध भारतात झालेली पाच सामन्यांची कसोटी मालिका इंग्लंडने जिंकली होती. तेव्हापासून २८ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अ‍ॅलिस्टर कुकच्या नेतृत्वाखाली खेळल्या गेलेल्या पहिल्याच मालिकेत इंग्लंडने हे यश मिळवले आहे. २००८-०९ साली भारतात खेळली गेलेली भारत विरुद्ध इंग्लंड ही तीन सामन्यांची मालिका भारताने १ विरुद्ध ० अशी जिंकली होती.
रविवारच्या ३ बाद १६१ या धावसंख्येवर इंग्लंड संघाने आज डाव सुरू केला. जास्तीत जास्त वेळ मैदानावर टिकून राहण्याचा मनसुबा रचून जोनाथन ट्रॉट व इयान बेल हे फलंदाज किल्ला लढवत राहिले. ट्रॉटने आज त्याच्या कसोटी कारकीर्दीतील आठवे शतक आणि बेलने कसोटीतील सतरावे शतक पूर्ण केले. उपाहारापर्यंत इंग्लंडची धावसंख्या ३ बाद २४० धावांवर पोहचली होती.
संथ गतीने, परंतु चिकाटीने खेळलेल्या ट्रॉट व बेल या जोडीने २०८ धावांची भागीदारी करून इंग्लंड संघाला तर मजबूत स्थितीत आणून ठेवलेच, शिवाय भारताला सामना जिंकता येऊच शकणार नाही याचीही निश्चिती केली. भारतीय गोलंदाजांनी जंग जंग पछाडूनही ही जोडी १३४व्या षटकापर्यंत फुटू शकली नाही.
रविवारी ५६ व्या षटकाअखेरीस खेळायला आलेल्या या जोडीने उपाहारानंतरच्या वेळेपर्यंत तब्बल ७८ षटके खेळून काढताना भारतीय गोलंदाजांची सर्व शस्त्रे निष्प्रभ ठरवली. अखेर ट्रॉटच्या १४६ धावा झाल्या असताना आर. अश्विनच्या गोलंदाजीवर कोहलीने लेग स्लिपमध्ये त्याचा झेल घेतला आणि आज भेदताच येणार नाही असे वाटत असलेली ही जोडी फुटली. परंतु एव्हाना भारतीय संघाचे व्हायचे ते नुकसान झाले होते. यावेळेपर्यंत इंग्लंड संघाला ३०६ धावांची आघाडी मिळाली होती. त्यामुळे इंग्लंडने डाव घोषित केला असता, तरी हे लक्ष्य गाठून सामना जिंकणे भारतासाठी अशक्य झाले होते.
यानंतर इयान बेल व जो रूट या जोडीने पाचव्या गडय़ासाठी ५० धावांची भागीदारी पूर्ण केली. चहापानानंतर १५४ षटके पूर्ण झाली असताना आणि इंग्लंडची धावसंख्या ४ बाद ३५२ वर पोहचली असताना दोन्ही संघांच्या कर्णधारांनी सामना संपवण्यास सहमती दर्शवली व हा सामना अनिर्णित अवस्थेत संपला. त्यामुळे इंग्लंड संघाने ही मालिका २-१ अशी खिशात घातली. यापूर्वी अहमदाबादचा पहिला सामना भारताने जिंकल्यानंतर मुं्बई व कोलकाता येथील सामन्यात इंग्लंडने विजय मिळवला होता.    
धावफलक
इंग्लंड पहिला डाव सर्वबाद ३३०, भारत पहिला डाव- ९ बाद ३२६ धावा (डाव घोषित).
इंग्लंड दुसरा डाव : अ‍ॅलिस्टर कुक झे. धोनी गो. आर. अश्विन १३, निक कॉम्प्टन पायचित ओझा ३४, केव्हिन पीटरसन त्रिफळाचित जडेजा ६, जोनाथन ट्रॉट झे. कोहली गो. अश्विन १४३ (१८ चौकार), इयान बेल नाबाद ११६ (१६ चौकार), जो रूट नाबाद २०, अवांतर २० (८ बाइज, ६ लेग बाइज, ६ नो बॉल ), एकूण १५४ षटकांत ४ बाद ३५२ धावा (डाव घोषित).
गोलंदाजी : इशांत शर्मा १५-३-४२-०, प्रग्यान ओझा ४०-१४-७०-१, आर. अश्विन ३८-११-९९-२, पीयूष चावला २६-६-६४-०, रवींद्र जडेजा ३३-१७-५९-१, गौतम गंभीर २-०-४-०.
बाद क्रम : १- ४८, २- ८१, ३-९४, ४- ३०२.
सामनावीर : जेम्स अ‍ॅन्डरसन.
मालिकावीर : अ‍ॅलिस्टर कुक.   

First Published on December 18, 2012 5:45 am

Web Title: historical win by england