पिछाडीवरून आघाडी घेत भारताने बलाढय़ बेल्जियमला ४-२ अशी धूळ चारून चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पध्रेची उपांत्य फेरी गाठली आहे. फेलिक्स डेनायीर (१२व्या मि.) आणि सेबास्टियन डॉकियर (१८व्या मि.) यांच्या आक्रमणाच्या बळावर बेल्जियमने २-० अशी आघाडी घेतली. परंतु रुपिंदर पाल सिंगने काही सेकंदांत आणखी एक गोल झळकावून भारताचे खाते उघडले. त्यानंतर एस. के उथप्पा (२७व्या मि.)ने बेल्जियमशी बरोबरी साधून दिली. मग ४१व्या मिनिटाला आकाशदीप सिंगने तिसरा गोल साकारून बेल्जियमला मागे टाकले. ४९व्या मिनिटाला धरमवीर सिंगने चौथा गोल केला. भारताने एका संस्मरणीय विजयाची नोंद करून चाहत्यांना सुखद धक्का दिला.
शनिवारी उपांत्य फेरीत भारताची गाठ पाकिस्तानशी होणार आहे. तर दुसऱ्या उपांत्य फेरीत विश्वविजेता ऑस्ट्रेलियाचा संघ ऑलिम्पिक विजेत्या जर्मनीशी झुंजणार आहे.
नेदरलँड्सच्या हॅग्वे शहरात या वर्षी झालेल्या विश्वचषक हॉकी स्पध्रेत बेल्जिमयने भारताला ३-२ अशा फरकाने पराभूत केले होते. त्या पराभवाचा भारताने वचपा काढला.
भारताने धिम्या गतीने सामन्यावर नियंत्रण प्राप्त केले. बेल्जियमने प्रारंभी सामन्यावर वर्चस्व मिळताना पहिल्या १० मिनिटांत दोन पेनल्टी कॉर्नर मिळवले. यापैकी दुसरा प्रयत्न गोलरक्षक पी. आर. श्रीजेशने हाणून पाडला. मग भारतासाठी गोल साकारण्याची सुवर्णसंधी डॅनिश मुज्ताबाला मिळाली. परंतु चेंडू गोलरक्षक व्हिन्सेंट व्ॉनशने अडवला.