११ ते २२ ऑक्टोबरदरम्यान बांगलादेशमधील ढाका येथे खेळवण्यात येणाऱ्या हॉकी आशिया चषकासाठी भारतीय संघाची आज घोषणा करण्यात आली आहे. हॉकी इंडियाने आज १८ सदस्यीय संघाची घोषणा करताना युवा खेळाडू मनप्रीत सिंहच्या हाती भारतीय संघाचं नेतृत्व सोपवलेलं आहे. तर भारताच्या आघाडीच्या फळीतला महत्वाचा खेळाडू एस.व्ही.सुनील या दौऱ्यात भारताचा उप-कर्णधार असणार आहे.

युरोप दौऱ्यात सिनीअर खेळाडूंना विश्रांती देऊन काही तरुण खेळाडूंना संघात जागा देण्यात आली होती. या दौऱ्यात भारतीय संघाला चांगले निकालही हाती आले. त्यामुळे आशिया चषकासाठी अनुभवी आणि युवा खेळाडूंचा मिलाफ साधण्याचा प्रयत्न हॉकी इंडियाने प्रयत्न केला आहे. एस.व्ही.सुनीलसोबत सरदार, आकाशदीप यासारख्या खेळाडूंनीही संघात पुनरागमन केलं आहे.

प्रशिक्षक रोलंट ओल्टमन्स यांच्या हकालपट्टीनंतर भारतीय संघाचा हा पहिलाच आंतराष्ट्रीय दौरा आहे. भारतीय हॉकीचे नवीन प्रशिक्षक जोर्द मरीन यांच्यासाठी हा पहिलाच आंतराष्ट्रीय दौरा आहे. त्यामुळे नवीन प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघ कशी कामगिरी करतोय, याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

या स्पर्धेत भारताचा समावेश अ गटात असून या गटात भारताला यजमान बांगलादेश, पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान आणि जपानचा सामना करावा लागणार आहे. भारताचा पहिला सामना ११ ऑक्टोबररोजी जपानविरुद्ध होणार आहे.

आशिया चषकासाठी असा असेल भारतीय संघ –

गोलकिपर – आकाश चिकटे, सुरज करकेरा
बचावपटू – दिप्सन तिर्की, कोठाजीत सिंह, सुरेंद्र कुमार, हरमनप्रीत सिंह, वरुण कुमार,
मधली फळी – एस.के.उथप्पा, सरदार सिंह, मनप्रीत सिंह ( कर्णधार ), चिंगलीन साना, सुमीत
आघाडीची फळी – एस.व्ही.सुनील ( उप-कर्णधार ), आकाशदीप सिंह, रमणदीप सिंह, ललित कुमार उपाध्याय, गुरजंत सिंह, सतबीर सिंह