भारतीय हॉकीच्या इतिहासात प्रथमच राष्ट्रीय संघातील खेळाडूंना भरघोस पारितोषिके मिळणार आहेत. हॉकी इंडियाने विविध गटातील सवरेत्कृष्ट खेळाडूंसाठी बक्षीस देण्याची योजना जाहीर केली आहे.
हॉकी इंडियाचे सरचिटणीस मुश्ताक अहमद यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, गेल्या दीड वर्षांत भारतीय खेळाडूंनी अतिशय चमकदार कामगिरी केली आहे. खेळाडूंच्या कामगिरीचे कौतुक व्हावे तसेच त्यांना भावी कारकीर्दीसाठी प्रोत्साहन मिळावे या हेतूने ही पारितोषिके दिली जाणार आहेत. भारताच्या वरिष्ठ पुरुष व महिला संघांमधील सवरेत्कृष्ट खेळाडूला प्रत्येकी २५ लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. महासंघाचे अध्यक्ष डॉ.नरेंद्र बात्रा यांचा मुलगा ध्रुव याचे नुकतेच निधन झाले. त्याच्या स्मरणार्थ ही पारितोषिके दिली जातील.
भारताच्या कनिष्ठ पुरुष व महिला (२१ वर्षांखालील) विभागातील सवरेत्कृष्ट उदयोन्मुख खेळाडूंना प्रत्येकी १० लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल.
सवरेत्कृष्ट गोलरक्षक, बचावरक्षक, मध्यरक्षक, आक्रमक खेळाडूंना प्रत्येकी पाच लाख रुपयांचे बक्षीस मिळेल. सपोर्ट स्टाफ व प्रशिक्षकांकरिता पाच लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे.