सुलतान अझलन शाह हॉकी स्पर्धेत भारताने न्यूझीलंडला ३-० ने पराभूत केलं आहे. या मॅचच्या दरम्यान भारताची बाजू निश्चितपणे वरचढ होती. या स्पर्धेच्या पहिल्या मॅचमध्ये भारताला इंग्लंडसमोर २-२ अशा बरोबरीवर समाधान मानावं लागलं होतं. पहिल्या मॅचमध्ये भारतालाल २-०ची आघाडी होती. पण ही आघाडी राखणं भारताला शक्य झालं नाही.

न्यूझीलंडच्या मॅचमध्ये मात्र भारतीय संघाने चांगली कामगिरी बजावली. यावेळी भारताचा गोलरक्षक श्रीजेशने अप्रतिम गोलरक्षण केलं. त्याने बजावलेल्या चांगल्या कामगिरीमुळे न्यूझीलंडला एकही गोल करता आला नाही.

मॅचच्या पहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांना गोल करण्याच्या काही संधी मिळल्या. पण त्यांचं त्यांना गोलमध्ये रूपांतर करतात आलं नाही. पण या क्वार्टरमध्ये भारताने न्यूझीलंडवर दबाव ठेवला आणि बचावही चांगल्या प्रकारे केला. क्वार्टर संपत असतानाच एस. व्ही सुनीलला गोल करायची एक चांगली संधी मिळाली होती, पण ती वाया गेली. न्यूझीलंडला मिळालेल्या एका पेनल्टी कॉर्नरचा बचाव श्रीजेशने उत्तम प्रकारे केला.

मॅचच्या दुसऱ्या क्वार्टरमध्ये न्यूझीलंडने आक्रमक खेळ केला. प्रतिस्पर्धी संघाने भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. उत्तरादाखल भारताने न्यूझीलंडच्या क्षेत्रात धडक मारत त्यांच्यावर दबाव आणला. मॅचच्या दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारताच्या मनदीप सिंगने गोल करत भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर दुसरा क्वार्टर भारतासाठी चांगला ठरला. भारताला तीन पेनल्टी कॉर्नर मिळाले आणि त्यातल्या एका पेनल्टी कॉर्नरचं रूपांतर गोलमध्ये करण्यात भारताला यश मिळालं. हरमनप्रीत सिंगने हा गोल करत भारताला २-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर न्यूझीलंडच्या आक्रमणातली हवाच निघून गेली. चौथ्या क्वार्टरमध्ये हरमनप्रीतने आणखी एक गोल करत भारताच्या ३-० विजयावर शिक्कामोर्तब केलं. आता भारतीय टीमची गाठ आता बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी होणार आहे.