गेल्या दोन मोसमांत उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेल्या हॉकी इंडिया लीगमध्ये आता ‘दबंग मुंबई’ हा संघ समाविष्ट झाला आहे. गुरुवारी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत दबंग मुंबई संघाचे नाव आणि लोगोचे अनावरण करण्यात आले. शनिवारी नवी दिल्लीत खेळाडूंचा लिलाव होणार असून त्यातून मुंबईचा संघ निवडण्यात येणार आहे. दबंग मुंबई संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून जर्मनीच्या व्हॅलेंटिन अल्टेनबर्ग यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भारताचा माजी अव्वल हॉकीपटू वीरेन रस्क्विन्हा संघाचा रणनीती सल्लागार आणि मार्गदर्शकाच्या भूमिकेत असणार आहे. भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार अनिल अल्डरिन सहप्रशिक्षक तसेच एडगर मॅस्कारेन्हास गोलरक्षक प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहे.
या वेळी रस्क्विन्हा म्हणाला, ‘‘मुंबईला पुन्हा एकदा नवी सुरुवात करावी लागणार आहे. लिलावात चांगल्या खेळाडूंवर बोली लावून मजबूत संघ बनवण्याचा आमचा विचार आहे. दबंग मुंबई संघाला उपांत्य फेरीत पोहोचवण्याचे तसेच मुंबईतील प्रेक्षकांना पुन्हा हॉकीकडे आकर्षित करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. ’’