दिल्ली वेव्हरायडर्स  व पंजाब वॉरियर्स यांच्यात हॉकी इंडिया लीगच्या विजेतेपदासाठी लढत होणार आहे. दिल्लीने उत्तर प्रदेश विझार्ड्सवर १-० अशी मात केली तर पंजाबने रांची ऱ्हिनोस संघाला ३-२ असे हरविले.
दिल्ली संघाचा विजयी गोल १४ व्या  युवराज वाल्मिकीने केला. सुरेख ड्रिपलिंग करीत सरदारा सिंगने गोलपोस्टच्या दिशेने चाल केली. त्याने दिलेल्या पासवर युवराजने उत्तर प्रदेशच्या गोलरक्षकाच्या खांद्यावरून चेंडू गोलात तटवला. पूर्वार्धात याच गोलच्या आधारे त्यांनी १-० अशी आघाडी घेतली होती. उत्तर प्रदेश संघाने दोन पेनल्टी कॉर्नरच्या संधी वाया घालवल्या.
पंजाबच्या विजयात ड्रॅग-फ्लीकर संदीप सिंगने दोन गोल करीत सिंहाचा वाटा उचलला. त्याने २१व्या व ५२व्या मिनिटाला हे गोल केले. किरॉन गोव्हर्सने ३०व्या मिनिटाला एक गोल करीत पंजाबच्या विजयास हातभार लावला. रांची संघाकडून अ‍ॅश्ले जॅक्सन व मॉरिट्झ फुर्टेझ यांनी प्रत्येकी एक गोल नोंदविला.