अव्वल दर्जाच्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सहभाग असलेली हॉकी इंडिया लीग येथे सोमवारपासून सुरू होत आहे. पहिल्या लढतीत कलिंगा लान्सर्स संघाची उत्तर प्रदेश विझार्ड्स संघाशी गाठ पडणार आहे.
कलिंगा स्टेडियमवर होणाऱ्या या लढतीत कलिंगा संघास सरावाचे मैदान, प्रेक्षकांचा पाठिंबा व अनुकूल वातावरण याचा फायदा होणार आहे. मात्र उत्तर प्रदेश संघातही अव्वल दर्जाचे खेळाडू असल्यामुळे त्यांच्याकडून कलिंगा संघास चांगली लढत मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळेच हा सामना अतिशय रंगतदार होईल असा अंदाज आहे. उत्तर प्रदेश संघाचे नेतृत्व ड्रॅगफ्लिकर व्ही.आर.रघुनाथ करीत असून प्रशिक्षकपदाची जबाबदारी ऑस्ट्रेलियाचे ज्येष्ठ खेळाडू मार्क हॅगर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. कलिंगाचे कर्णधारपद मॉरिट्झ याच्याकडे देण्यात आले आहे. त्यांचे प्रशिक्षकपद रॉजर व्हान जेन्ट यांच्याकडे सोपविण्यात आले आहे.
या स्पर्धेसाठी यंदा संघांच्या स्वरूपाबाबत काही बदल झाले आहेत. अनेक खेळाडूंचा नव्याने लिलाव करण्यात आला आहे. प्रशिक्षकांमध्येही बदल झाले आहेत. त्यामुळे सहभागी प्रत्येकासाठी ही स्पर्धा आपले कौशल्य दाखविण्यासाठी खरी कसोटीच ठरणार आहे. दिल्ली वेवरायडर्स संघाचा सरदारसिंग हा आता पंजाब वॉरियर्सकडून खेळणार आहे. मॉरिट्झ फ्यस्र्टे याचे या स्पर्धेत पुनरागमन झाले असून तो कलिंगा संघाचे प्रतिनिधित्व करीत आहे.
या लीगमधील खेळाडू व प्रशिक्षकांकरिता यंदा पाच कोटी ७० लाख रुपयांची पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. हीरो समूहाऐवजी यंदा कोल इंडिया समूहाने स्पर्धेचे मुख्य प्रायोजकत्व स्वीकारले आहे. यंदा गोलसंख्येबाबत नवीन नियम करण्यात आला आहे. त्यानुसार जेव्हा एक गोल होईल, तेव्हा दोन गोल मोजले जातील. ही स्पर्धा सहा शहरांमध्ये होणार असून अंतिम सामना २१ फेब्रुवारी रोजी रांची येथे होईल.