पाकिस्तानी खेळाडूंची खुन्नस, भारताविरुद्ध खेळताना त्यांना चढणारा चेव हा क्रिकेटच्या मैदानावर बहुतेक वेळेस पाहावयास मिळतो. पण असेच काहीसे आता हॉकीच्या मैदानातही पाहावयास मिळत आहे.  चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत, शेवटच्या मिनिटात गोल करून पाकिस्ताननं भारतावर ४-३ ने विजय मिळवला आणि अंतिम फेरीत धडक मारली. अटीतटीच्या या सामन्यातील विजयानंतर पाकिस्तानी खेळाडूंनी  कपडे काढले, भारतीय चाहत्यांपुढे येऊन तोंडावर बोट ठेवले, ठेंगा दाखवला आणि अश्लील हावभाव केले. त्याच्या या उन्मादावर नियंत्रण ठेवायचा प्रयत्न प्रशिक्षक करत होते, पण खेळाडूंना भलतीच नशा चढली होती. याविरोधात आक्षेप नोंदवित भारताने पाकिस्तानविरूध्द तक्रार नोंदविली आहे. विजयाचा जल्लोष करावा पण त्याला अश्लील हावभाव नसावा असं सांगत पाकिस्तानी खेळाडूंच्या या जल्लोषाविरूध्द भारतानं नाराजी व्यक्त करीत तक्रार नोंदविली आहे, अशी माहिती भारतीय हॉकी संघाचे नरेंद्र बत्रा यांनी दिली. पाकिस्तानी खेळाडूंच्या असंस्कृत वर्तनाबद्दल त्यांच्या हॉकी संघाचे प्रशिक्षक शाहनाज शेख यांनी भारताची माफी मागितली आहे. पण ही माफी भारताने फेटाळली. सदर प्रकारानंतर संतप्त भारताने आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनचा सामना आयोजित करण्यास नकार दिला होता पण पाकिस्तानी संघ प्रशिक्षकाने माफी मागितल्यामुळे पाकिस्तानी खेळाडूंवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही. त्यामुळे आता आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशन कारवाई करत नाही तोवर पाकिस्तानबरोबर कुठलीही मॅच खेळणार नाही, अशी कठोर भूमिका भारताने घेतली आहे.