युरोप दौऱ्यावर असलेल्या भारतीय पुरुष हॉकी संघाला बेल्जियमविरुद्धच्या सराव सामन्यात १-२ असा पराभव स्वीकारावा लागला.
भारतीय संघाचा आगामी विश्वचषक स्पर्धेसाठी नार्देन (नेदरलँड्स) येथे दौरा सुरू आहे. चुरशीने झालेल्या लढतीत भारताने बेल्जियमविरुद्ध सुरुवातीला खेळावर नियंत्रण मिळवले होते. तथापि १७व्या मिनिटाला बेल्जियमला पेनल्टी कॉर्नर मिळाला. त्याचा फायदा घेत टोम बून याने गोल करीत संघाला आघाडी मिळवून दिली. पूर्वार्धात याच गोलच्या आधारे बेल्जियमने आघाडी राखली होती.
उत्तरार्धात सामन्याच्या ५८व्या मिनिटाला भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला. त्याचा फायदा घेत उपकर्णधार रुपींदरपाल सिंगने गोल करत १-१ अशी बरोबरी साधली. ही बरोबरी फार वेळ राहिली नाही. बूनने पुन्हा एकदा गोल झळकावत  बेल्जियमला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. हीच आघाडी कायम ठेवत बेल्जियमने विजय मिळविला.
भारताने या दौऱ्यात आतापर्यंत लीदेन क्लबला ७-० असे हरवले होते तर डच राष्ट्रीय क्लबविरुद्धचा सामना ३-३ असा बरोबरीत सोडवला होता. भारताचा गुरुवारी नेदरलँड्स राष्ट्रीय क्लबबरोबर सामना होणार आहे.

महिलांमध्ये भारताचा आर्यलडवर विजय
नवी दिल्ली : चुरशीच्या लढतीत एक गोलच्या पिछाडीवरून उत्कृष्ट सांघिक खेळ करत भारतीय महिला हॉकी संघाने आर्यलडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत ३-१ असा विजय मिळविला. आगामी चॅम्पियन्स चॅलेंज स्पर्धेसाठी पूर्वतयारी म्हणून भारतीय संघाची ही मालिका आयोजित करण्यात आली आहे. मेगान फ्रेझर हिने चौथ्या मिनिटालाच जोरदार चाल करीत आर्यलडचे खाते उघडले. भारताकडून पूनम राणी (३७ वे मिनिट), रितू राणी (६१ वे मिनिट) व सुनीता लाकरा (६८ वे मिनिट) यांनी गोल करीत संघास विजय मिळवून दिला.
सामन्याच्या पूर्वार्धात आर्यलडच्या खेळाडूंचे प्राबल्य होते. उत्तरार्धात भारतीय खेळाडूंना सूर गवसल्यानंतर भारताने लागोपाठ तीन गोल करत सामन्यावर वर्चस्व गाजवले.