महेंद्रसिंग धोनीच्या निमित्ताने प्रकाशझोतात आलेले रांची आता खऱ्या अर्थाने क्रीडा क्षेत्राच्या पटलावर येत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमसह आता हॉकी इंडिया लीगच्या सामन्यांचा थरारही रांचीमध्ये अनुभवता येणार आहे.
१४ जानेवारी ते १० फेब्रुवारी या कालावधीत होणाऱ्या हॉकी इंडिया लीगची उपांत्य फेरी, अंतिम सामना तसेच तिसऱ्या स्थानासाठीची लढत यासाठी रांचीला प्राधान्य मिळाले आहे. पाच फ्रँचाइज संघांच्या या स्पर्धेसाठी रांचीतील बिरसा मुंडा हॉकी स्टेडियम सज्ज झाले आहे.
उपांत्य फेरी, अंतिम लढत आणि तिसऱ्या आणि चौथ्या स्थानासाठीच्या लढतीसाठी रांचीची निवड झाली आहे. सामने सुरळीत व्हावेत यासाठी आवश्यक प्रक्रिया राबवण्यात येईल. या संदर्भातील अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येईल असे हॉकी इंडियाच्या सूत्रांनी सांगितले. या लीगमधील एक संघ रांची ऱ्हिनोस संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बंटी सिंग यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. संयोजकांनी याबाबत झारखंडच्या मुख्यमंत्र्याशी चर्चा केली असल्याचेही त्यांनी सांगितले.