भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) वार्षिक सर्वसाधारण सभा सप्टेंबरमध्ये नियोजित तारखांनाच ठेवावी, अशी विनंती आयपीएल स्पॉट-फिक्सिंग खटल्यातील याचिकादार आदित्य वर्मा यांनी प्रभारी अध्यक्ष शिवलाल यादव यांना केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आयपीएल प्रकरणाची चौकशी करणाऱ्या मुकुल मुदगल समितीला सोमवारी दोन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. याचप्रमाणे एन. श्रीनिवासन यांनाही बीसीसीआयच्या अध्यक्षपदावर काम करण्यास ठामपणे नकार दिला आहे.
वर्मा यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, ‘‘बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याची काही पदाधिकाऱ्यांची योजना आहे. श्रीनिवासन यांना सर्वोच्च न्यायालयाकडून हिरवा कंदील न मिळेपर्यंत बीसीसीआयच्या निवडणुका तहकूब करण्याचा त्यांचा कट आहे.’’