भारताचा आदर्श जोपासून मायदेशातील संघाला सहकार्य करतील अशा अनुकूल खेळपट्टय़ा खेळपट्टीतज्ज्ञांनी तयार कराव्यात, असे आवाहन ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसनने करीत डिसेंबरमध्ये होणाऱ्या कसोटी मालिकेच्या पाश्र्वभूमीवर भारतीय संघाला एक प्रकारे इशाराच दिला आहे.
‘‘भारतात नेहमीच त्यांच्यासाठी अनुरूप परिस्थिती तयार केली जाते. त्यामुळे आम्हालासुद्धा अनुकूल खेळपट्टय़ा मिळतील, अशी अशा प्रकट करतो,’’ असे वॉटसनने एका मुलाखतीत म्हटले आहे. भक्कम फलंदाजांचा समावेश असलेल्या भारतीय संघाला ऑस्ट्रेलियातील परिस्थितीत आव्हानात्मक असेल, असे वॉटसनने सांगितले. दुखापतीतून सावरल्यानंतर वॉटसनने स्थानिक क्रिकेटमध्ये सरावाला प्रारंभ केला आहे.
पुनरागनाबाबत वॉटसन म्हणला, ‘‘सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये यशस्वी सलामीवीराची भूमिका बजावली आहे. माझे खेळावर अतिशय प्रेम आहे, मी कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करून सर्वोत्तम खेळ करण्यासाठी प्रयत्नशील राहीन.’’
तो पुढे म्हणाला की, ‘‘मी खालच्या क्रमांकावर फलंदाजी केल्यास परिस्थितीत हाताळणे मला थोडेसे अवघड जाईल. त्या क्रमांकांवर फलंदाजी करण्याची मानसिकता तयार नसल्यामुळे माझ्या कामगिरीवर परिणाम होऊ शकेल.’’