आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्लेजिंग हा प्रकार आता सर्वश्रुत झाला आहे. त्यात भारत आणि पाकिस्तानचा सामना असला की कधीकधी स्लेजिंगची हद्द पार होते, असे अनेक प्रकार आपण आतापर्यंत मैदानात पाहिले असतील. सचिन तेंडुलकरलाही आपल्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये स्लेजिंगचा शिकार व्हावं लागलं होतं. पाकिस्तानचा माजी गोलंदाज अब्दुल कादीरने सचिनची त्याच्या वयावरुन खिल्ली उडवली, मात्र सचिनने यानंतर अब्दुल कादीरला स्वतःच्या बॅटमधून असं काही उत्तर दिलं की अब्दुल कादीर ते आयुष्यभर विसरु शकला नसेल.

१९८९ साली पेशावरमध्ये पाकिस्तानविरुद्ध सचिनने आंतराष्ट्रीय सामन्यांमध्ये पदार्पण केलं. यावेळी सचिनला पाकिस्तानी चाहते आणि खेळाडूंच्या स्लेजिंगचा सामना करावा लागला होता. काही प्रेक्षकांनी तर पोस्टरवर सचिनला, घरी जाऊन दूध पी! असाही संदेश दिला. मात्र या सर्व प्रकाराचा सचिनवर जराही परिणाम झाला नाही. त्याने मुश्ताक अहमदच्या गोलंदाजीवर दोन सणसणीत षटकार लगावले. पहिला सामना खेळणारा लहान मुलगा आपल्या गोलंदाजांची धुलाई करत असल्याचं पाहून पाकिस्तानचा गोलंदाज अब्दुल कादीरला राग आला.

या रागात अब्दुलने सचिनजवळ जात लहान मुलांना काय मारतोस? हिम्मत असेल तर माझ्या गोलंदाजीवर षटकार मारुन दाखव ना, असं खुलं आव्हान दिलं. यानंतर सचिनने अब्दुल कादिरच्या गोलंदाजीवर तीन षटकार ठोकत त्याची बोलतीच बंद केली. यानंतर बीबीसीला दिलेल्या एका मुलाखतीत कादीर यांनी या प्रसंगाविषयी अधिक माहिती दिली. “माझ्या गोलंदाजीवर कोणत्याही फलंदाजाने ३ षटकार ठोकले नव्हते. मी सचिनविरुद्ध पूर्ण ताकदीने गोलंदाजी करत होतो. मात्र तरीही त्याने माझी धुलाई केली.”

सचिनने आपल्या २४ वर्षांच्या आंतराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत ४६३ वन-डे सामन्यांमध्ये १८ हजार ४२६ धावा काढल्या आहेत. यात ४९ शतकं तर ९६ अर्धशतकांचा समावेश आहे. कसोटी सामन्यात सचिनने २०० सामन्यांमध्ये १५ हजार ९२१ धावा काढल्या आहेत, ज्यात ५१ शतकं आणि ६८ अर्धशतकांचा समावेश आहे.